गोमंतकीय तरुणाईवर रशियन भाषेचे गारुड !
By admin | Published: February 1, 2015 01:27 AM2015-02-01T01:27:18+5:302015-02-01T01:27:18+5:30
गोव्यात हॉटेलच्या फलकांवर, मेनू कार्डवर असलेली रशियन भाषा आता गोमंतकीय तरुणही बोलू लागले आहेत. यामागे रोजगाराचे कारण तर आहेच,
सुशांत कुंकळयेकर - मडगाव (गोवा)
गोव्यात हॉटेलच्या फलकांवर, मेनू कार्डवर असलेली रशियन भाषा आता गोमंतकीय तरुणही बोलू लागले आहेत. यामागे रोजगाराचे कारण तर आहेच, पण त्याचबरोबर जीवनसाथी शोधण्याचेही काहींचे प्रयोजन आहे. एकप्रकारे रशियन भाषेने येथील तरुणाईवर गारुडच केले आहे.
२५-३0 वर्षांपूर्वी ब्रिटिश पर्यटकांना गोव्याची भुरळ पडल्यानंतर तेथून पर्यटकांचा ओघ सुरू झाला. साहजिकच पर्यटनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी गोव्यातील तरुणांमध्ये इंग्रजी शिकण्याची क्रेझ होती. मात्र सात-आठ वर्षांपासून रशियन पर्यटकांचा ओघ वाढल्याने ‘गोंयकार’ आता रशियन भाषा शिकू लागले आहेत. पर्यटन व्यवसायात जम बसविण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने रशियन भाषा शिकत आहेत. याशिवाय रशियन युवतींना आकर्षित करण्यासाठी त्यांना या भाषेची गरज भासते. रशियन शिकणाऱ्यांमध्ये काही भारतीय पर्यटकही आहेत, असे निरीक्षण ‘मोगान’ या कोंकणी चित्रपटाचे निर्माते नरेंद्र गावकर यांनी सांगितले. गोव्यात मागील काही वर्षांत रशियन पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. गोव्यात येणाऱ्या दहापैकी केवळ एकाच रशियन पर्यटकाला इंग्रजी भाषा समजते. त्यामुळे रशियनांना भुलविण्यासाठी शॅक्स व हॉटेलचे फलकही रशियन भाषेत दिसतात. आता तर पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा येणेही गरजेचे बनले आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेली कोणतीही नोकरी मिळवायची असेल, तर तुम्हाला रशियन भाषा येणे ही जमेची बाजू मानली जाते.
बहुतेक ट्रॅव्हल
एजंट रशियन भाषा शिकतात. कित्येक वेळा रशियन तरुणींची मने जिंकणे हाही भाषा शिकण्याचा तरुणांचा उद्देश असतो. रशियन भाषा कठीण असली तरी त्यातील काही शब्द समजल्यानंतर रशियन युवतींशी संवाद सुकर होतो. गोव्यात रशियन पुरुषांपेक्षा महिला पर्यटकांची संख्या अधिक असते व तरुणींची संख्या लक्षणीय आहे.
- नलिनी ई-सौझा, व्यवस्थापिका,
भाषा प्रशिक्षण केंद्र
‘आप’
आणि ‘तुम’
कधी कधी रशियन संवादाचे बुमरँगही होते. हिंदीप्रमाणेच रशियन भाषेतही ‘तुम’ व ‘आप’ असा फरक आहे.
कित्येकदा रशियन भाषा शिकणारे नवशिके ‘आप’च्या जागी ‘तुम’ म्हणतात आणि विसंवाद होतो. ‘प्रिवेट’ म्हणजे रशियन भाषेत ‘हॅॅलो’.
एखाद्यांला पहिल्यांदाच भेटतो तेव्हा त्यांना ‘हॅलो’ म्हणायचे नसते. मात्र रशियन संस्कृतीची माहिती नसल्याने ‘हॅलो’ म्हणतात.
साहजिकच त्यामुळे गैरसमज होतात, असे गोव्यात स्थायिक झालेल्या स्वेटलाना या रशियन महिलेने सांगितले.
गोव्यात येणाऱ्या काही रशियन महिलाही भारतीय
भाषा शिकत आहेत. काही रशियन तरुणी तर भारतीय तरुणांशी विवाह करीत आहेत. त्यांना सासू-सासऱ्यांवर ‘इम्प्रेशन’ पाडायचे असते. त्यामुळे त्या हिंदी भाषा शिकत आहेत, असे पणजीच्या भाषा केंद्राच्या संचालक वहिदा सवास यांनी सांगितले.