रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल; डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 12:55 AM2020-11-14T00:55:19+5:302020-11-14T07:04:23+5:30

लवकरच चाचण्या

Russia's Sputnik V vaccine introduced in India | रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल; डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजकडे जबाबदारी

रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल; डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजकडे जबाबदारी

Next

नवी दिल्ली : रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल झाली आहे. या लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. या चाचण्या भारतात पार पाडण्याची जबाबदारी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्वीकारली आहे. चाचण्यांना औषध नियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतर ही लस भारतात आणण्यात आली.

रशियातील मानवी चाचण्यांत ही लस ९२ टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले होते. स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस रशियातील स्वयंसेवकांना दिल्यानंतर २१ दिवसांनी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या स्वयंसेवकांमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले होते. स्पुटनिक व्ही लसीचा कोणताही दुष्परिणाम अद्याप आढळलेला नाही.

स्पुटनिक व्ही लसीची रशियाने ऑगस्ट महिन्यात नोंदणी केली. सप्टेंबरमध्ये या लसीच्या तिथे मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू झाल्या. मात्र त्याआधीच तिच्या वापराबद्दलची परवानगी रशियाच्या औषध नियंत्रकांनी दिली होती. अशी परवानगी मिळविणारी ती जगातील पहिली लस आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या दर्जाबद्दल काही देशांतील शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केली होती.

लसीआधीच सामूहिक प्रतिकारशक्ती?

कोरोना लस उपलब्ध होण्याआधीच या रोगाविरोधात मोठी सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी कदाचित लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यावीशी वाटणार नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

चाचण्यांचे निकाल परस्परविरोधी -मस्क

न्यूयॉर्क : टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी कोविड-१९ चाचण्यांच्या अचूकतेबद्दल गुरुवारी प्रश्न उपस्थित केला. मस्क यांनी दावा केला की, एकाच दिवशी माझ्या चाचणीचा निकाल दोन वेळा सकारात्मक आला व त्याच दिवशी दोन वेळा चाचणी नकारात्मक आली.

“काही तरी कमालीचे बोगस काम सुरू आहे. आज (गुरुवारी) चार वेळा कोविडसाठी चाचणी केली. दोन चाचण्या नकारात्मक, तर दोन सकारात्मक निघाल्या. यंत्र तेच, चाचणी तीच, तीच परिचारिका. रॅपिड अँटिजन टेस्ट फ्रॉम बीडी,” असे मस्क यांनी ट्विटरवर म्हटले. बहुधा त्यांना बेक्टन डिकिन्सन अँड कंपनीच्या रॅपिड अँटिजन चाचणीबद्दल म्हणायचे असेल.

Web Title: Russia's Sputnik V vaccine introduced in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.