रस्टी
By admin | Published: October 17, 2016 05:09 AM2016-10-17T05:09:31+5:302016-10-17T05:09:31+5:30
मसुरीजवळच्या घरी जाऊन रस्किन बॉण्ड यांच्याशी केलेल्या गप्पांची सैर
मसुरीजवळच्या घरी जाऊन रस्किन बॉण्ड यांच्याशी केलेल्या गप्पांची सैर
- शर्मिला फडके
कडुनिंबाच्या झाडाखालची चारपाई. अजून पूर्ण न उगवलेला चंद्र. रातकिड्यांची किरकिरही अजून सुरू झालेली नाही. आकाशात चांदण्यांचा खच आहे. कडुनिंबाच्या पालवीत काहीतरी खसफसतं. ... मी घाबरत नाही. एखादा अजून झोपी न गेलेला पक्षीच असणार हा. शांत, हिरवा अंधार. हॉटेलच्या गच्चीवरून लाल तिब्बावरचा फिकट उजेड दिसतो. पंखांसारखं काहीतरी चमकदार उडत जातं नजरेसमोरून. माउंटन फेअरिज?
मी पुन्हा बघते तर त्या अदृश्य झाल्या आहेत. अजूनही काही आकार आसपास.. रस्किनच्या घोस्ट स्टोरीज आठवतात. पहाडांवरची भुतं, सेव्हॉय हॉटेलातले भटकते आत्मे. हे असं काय होतं आहे? काय होणार दुसरं...रस्किनला प्रत्यक्ष भेटल्यावर !!!
रस्किनचं वय वाढलं आहे, पण होता तसाच आहे तो... गुबगुबीत. हसरा. ‘थोडा आळशी झालोय हल्ली’ म्हणतो. बाहेर फिरायला जाणं नको वाटतं हल्ली त्याला. तो सांगतो, ‘इथं रहायला आलो तेव्हा मसुरीमधे फक्त सहा जणांकडे गाड्या होत्या. आता मसुरी ते लाल तिब्बा रस्त्यावर एका वेळी सहा हजार वाहनं असतात टुरिस्ट सीझनला. एके काळी दऱ्यांमध्ये स्फटिकशुभ्र दव शिंपडणारं धुकं असायचं, आता तिथे प्रदूषणाचे मळकट ढग असतात. ही कळ चोवीस तास हृदयातून जात नाही.’
- तरीही हिमालयाच्या कुशीत गुरफटून तो लिहितोच आहे अजून. म्हणतो, उद्या सूर्य उगवेल.. मग पक्षी गातील... हवेतला
गारवा थोडा कमी होईल...तेव्हा मी तुला एक गोष्ट सांगीन...’