निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:09 AM2024-05-05T11:09:11+5:302024-05-05T11:12:24+5:30
S. Jaishankar News: काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये झालेल्या खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी तीन भारतीयांना अटक करण्यात आली आहे. आता या कारवाईबाबत तसेच कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर केलेल्या टीकेबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये झालेल्या खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी तीन भारतीयांना अटक करण्यात आली आहे. आता या कारवाईबाबत तसेच कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर केलेल्या टीकेबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून कॅनडामध्ये जे काही घडत आहे तो त्यांच्या अंतर्गत राजकारणातून घडत आहे. तसेच त्याच्याशी भारताचं काहीही देणंघेणं नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
एस. जयशंकर म्हणाले की, खलिस्तान समर्थक लोकांचा एक वर्ग कॅनडाच्या लोकशाहीचा वापर करून घेत आहे. ते आपली एक लॉबी तयार करत आहेत. तसेच त्यांची एक व्होट बँक तयार झाली आहे. कॅनडामध्ये सत्ताधारी पक्षाकडे संसदेत बहुमत नाही आहे. तसेच काही पक्ष हे खलिस्तान समर्थक नेत्यांवर अवलंबून आहेत. आम्ही अनेकदा अशा लोकांना व्हीसा, मान्यता आणि राजकारणात स्थान देऊ नका, असा सल्ला दिला होता. मात्र कॅनडा सरकारकडून त्याबाबत काहीही पावलं उचलण्यात आली नाहीत. भारताने कॅनडाकडे खलिस्तान समर्थक असलेल्या २५ जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र कॅनडाने त्याकडे दुर्लक्ष केले.
जयशंकर म्हणाले की, विकसित भारत बनवण्यासाठी परराष्ट्रासह विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या मजबूत आणि सक्रिय पंतप्रधानांची आवश्यकता आहे. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा आधीच्या तुलनेत बऱ्यापैकी उंचावली आहे. विविध देशांचे प्रमुख भारत आणि भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक करतात. त्याला कॅनडा हा एक अपवाद आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यानंतर या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारताने आरोप फेटाळून लावले होते. मात्र त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.