मरकजमध्ये कार्यक्रम न घेण्याचा साद यांनी सल्ला धुडकावला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:05 AM2020-04-08T05:05:18+5:302020-04-08T05:05:34+5:30
बुद्धिवंतांनी केली होती विनंती : अनुयायांना संकटात लोटल्याचे मत
नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी यांना त्यांचे स्वत:चे सहकारी, अनेक ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू व बुद्धिवंतांनी कोविड-१९चा उद्रेक झाल्यानंतर लगेच गेल्या मार्च महिन्यातील निजामुद्दीन कार्यक्रम रद्द करा असा सल्ला देऊन विनंती केली होती; परंतु साद यांनी ती ऐकली नाही, असे समजते.
माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, असे आपल्या अनुयायांना शिकवण दिलेल्या साद कंधलावी यांच्या दुराग्रहामुळे त्यांच्या शेकडो अनुयायांचे जीवित संकटात लोटले गेले आहे. एवढेच नाही तर मुस्लिमांची प्रतिमाही कलंकित झाली आहे, असे मुस्लिमांतील अनेकांचे म्हणणे आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेक जणांची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्याचवेळी साद कंधलावी हे आपल्या मूठभर सल्लागारांना घेऊन लपून बसले आहेत. देशात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातील ३० टक्के हे जमातशी संबंधित आहेत. हीच टक्केवारी उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत जाते. तबलिगी जमातचा दुसरा गट ‘शुरा-ए- जमात’ने कोरोना विषाणूचा उद्रेक होताच आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. अविचल राहिलेले मौलाना साद यांनी पूर्वीच ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा आग्रह केला ‘मशिदीतील मृत्यू उत्तम’ याबाबत प्रवचनही दिले.
नाव न सांगण्याच्या अटीवर मौलाना सादचे एक निकटस्थ म्हणाले की, त्यांना अनेकदा कार्यक्रम रद्द करण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:च्याच अनुयायांना मृत्यूच्या खाईत ढकलले. काँग्रेसचे नेते मीम अफजल आणि मुस्लिम नेते जफर सरेशवाला यांनीही मौलाना साद यांना कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला, मात्र, ते जुमानले नाहीत, असा खुलासा केला आहे. दुसरीकडे मौलाना साद यांचे सहकारी मौलाना हयारिस यांनी त्यांची बाजू घेतली. ते म्हणाले,जेव्हा जमातचे सदस्य विदेशातून येत होते, तेव्हा सरकारने त्यांना परवानगी दिली, त्यात आमची काय चूक आहे?
कोरोनाच्या महामारीबद्दल ते अज्ञानी कसे
तबलिगी जमातचे ज्येष्ठ मोहम्मद आलम म्हणाले की, ‘‘साद यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. परंतु, त्यांच्या दुराग्रही वृत्तीमुळे निष्पाप तबलिगी महामारीच्या जबड्यात लोटले गेले’’.
च्जी व्यक्ती जगातील मुस्लिमांचे आपण आमीर असल्याचा दावा करते आणि मक्का आणि मदिनानंतर तबलिगी मरकज हे सर्वात पवित्र स्थळ असल्याचे सांगते ती कोरोना विषाणूच्या महामारीबद्दल एवढी कशी अज्ञानी राहू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला.
च्आणखी एक वृद्ध तबलिगी सदस्य लियाकतअलीखान म्हणाले की, ‘‘जबाबदार मुस्लिम बुद्धीवंतांनी दिलेला सल्ला मौलाना साद यांनी का निरुपयोगी ठरवला? आणि आता ते का लपून बसले आहेत व विषाणूची बाधा झाली की नाही याची तपासणी का करून घेत नाहीत?’’