सबरीमाला : महिला प्रवेश मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:31 AM2021-03-20T07:31:34+5:302021-03-20T07:31:43+5:30
सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता.
मलप्पुरम : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सबरीमाला देवस्थानात महिलांना प्रवेश देण्याचे प्रकरण विरोधकांनी लावून धरले आहे. राज्यातील डाव्या आघाडीचे सरकार हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याची टीका भाजप व काँग्रेसने केली आहे. सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता.
केरळचे देवस्थानमंत्री के. सुरेंद्रन यांनी आता म्हटले आहे की, हे प्रकरण हाताळताना आमच्याकडून चूक झाली. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, सबरीमाला प्रकरणी पक्षाची भूमिका कायम आहे, महिलांनाही समान हक्क असायला हवेत. सर्व वयोगटाच्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळायला हवा. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप व काँग्रेसने डाव्या आघाडीच्या सरकारवर हल्ला चढवला. माकप भक्तांचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीतला यांनी केली. येचुरी यांच्या वक्तव्याने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा खरा चेहरा समोर आला असून, हिंदू भक्तांचा राज्यात अपमान केला जात आहे, असा आरोप भाजपनेही केला.
मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, मंदिरात सर्व वयाेगटांतील महिलांना प्रवेश देण्याबाबतची पुनर्विचार याचिका न्यायालयात असून, तिचा निर्णय देईल, त्यावेळी सरकार सर्व पक्षांशी विचारविनिमय करेल.
सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश हा निवडणुकीचा विषय असू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळीही भाजप व काँग्रेसने हा मुद्दा ताणून धरला; पण जनतेने मात्र आम्हालाच मते दिली.
- पिनराई विजयन, मुख्यमंत्री