Sabarimala temple row: मंदिर प्रवेशासाठी पोलीस संरक्षण द्या; महिलांची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 07:07 PM2018-10-23T19:07:01+5:302018-10-23T19:08:12+5:30
Sabarimala temple row: चार महिलांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केरळ उच्च न्यायालयाकडे केली आहे. या चार महिलांमध्ये दोन वकील आहेत.
तिरुवनंतपुरम : केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरुन वाद सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांच्या महिलांना या मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतरही पन्नाशीच्या आतील महिलांना तथाकथित भक्तांनी विरोध केला आहे. याप्रकरणी चार महिलांनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केरळ उच्च न्यायालयाकडे केली आहे. या चार महिलांमध्ये दोन वकील आहेत.
Four women including two lawyers approached Kerala High Court seeking police protection to go to #SabarimalaTemple. They claimed that Supreme Court had given women the permission to enter the temple. #Keralapic.twitter.com/Gy5b6YFt5I
— ANI (@ANI) October 23, 2018
शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या मुली व महिलांना जाण्यास बंदी आहे. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवून मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. मात्र, येथील भाविकांनी महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल केलेली याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्यात यावी, अशी विनंती अॅड. मॅथ्यूज नेदुम्परा यांनी केली आहे. अशा 19 याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
शबरीमाला मंदिरात महिलांना अद्याप प्रवेश नाहीच
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना, मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्याने महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ, अशी धमकीच दिली आहे. गेल्या शुक्रवारी एक महिला पत्रकार व तिची एक सहकारी अशा दोघी जणी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत सुमारे 250 पोलीस संरक्षण होते. शिवाय त्यांच्या डोक्यावर हेल्मेट आणि अंगात बुलेटप्रुफ जॅकेट होते. पोलिसांनीच त्यांना ते घालण्यास सांगितले होते. त्यांच्यासह पोलीस मंदिरापर्यंत पोहोचले, तेव्हा भाविकांनी त्यांचा रस्ताच रोखून धरला. पोलीसही त्या भाविकांना हटवू शकले नाहीत. त्याच वेळी महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास आपण दरवाजे बंद करून निघून जाऊ अशी धमकी दिली. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता.
पद्मापूर्णी म्हणाली, 'शबरीमाला मंदिरात 41 वर्षांनंतर येणार'
रविवारी (दि.21) नऊ वर्षांची पद्मापूर्णी मंदिरात दर्शन घेण्यासाठी हातात एक पोस्टर घेऊन दाखल झाली. यावेळी या पोस्टरवर लिहिले होते की, मी नऊ वर्षांची आहे. शबरीमालाला भेट देण्याची ही तिसरी वेळ आहे. आता याठिकाणी मी 50 वर्षांची झाल्यानंतर येणार आहे. दरम्यान, पद्मापूर्णीच्या सांगण्यावरुन असे समजते की, ती मंदिराबाबत लोकांमध्ये असलेली परंपरा कायम ठेवण्याचा संदेश देत आहे. यासाठी तिच्या कुटुंबातील लोक पोस्टर घेऊन मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी पद्मापूर्णा म्हणाली, 'मी आता 40 वर्षे शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकणार नाही, यावर मी अजिबात दु:खी नाही'.