सचिन संसदेत गैरहजर, मात्र विकासकामांत अग्रेसर
By Admin | Published: December 23, 2015 11:17 AM2015-12-23T11:17:54+5:302015-12-23T11:29:42+5:30
राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिन तेंडुलकरची संसदेतील उपस्थिती कमी असली तरी खासदार म्हणून काम करण्यात तो अग्रेसर आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणा-या खासदार सचिन तेंडुलकरची राजकारणाच्या पीचवरची कामगिरी खराब असली तरीही खासदारनिधीचा विकासकामांसाठी विनीयोग करण्यात तोच अग्रेसर आहे.
राज्यसभेतील सचिनची उपस्थिती ६ टक्क्यांपेक्षाही कमी आहे, मात्र काम करण्यात तो आघडीवर आहे. राज्यसभेतील उपस्थितीपेक्षा त्याने विकासकामांवर थेट लक्ष केंद्रित केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, सचिनने विकासकामांसाठी आत्तापर्यंत ९८ टक्के खासदार निधीचा वापर केला आहे. त्याने जम्मू-काश्मीर व तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्यात निधीचा विनीयोग केला आहे. तसेच उत्तराखंड येथे आलेल्या विनाशकारी पूरानंतर मुकसानग्रस्त चमोली गावातील पूल बांधण्यासाठी व शाळेच्या पुनर्उभारणीसाठीही सचिनचा खासदार निधी वापरण्यात आला आहे. तसेच तामिळनाडूतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'स्वच्छ भारत' अभियानाचा अॅम्बॅसेडर म्हमून सचिनच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्याने मुंबईत स्वच्छतागृहे उभारण्यात व महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील दुर्गम भागांत शाळा उभारणीसाठीही खासदार निधीचा विनीयोग केला.
तसेच पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आदर्श गाव योजनेअंतर्गत सचिनने गेल्या वर्षी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील पुट्टमराजू कांदिग्रा हे गाव दत्तक घेतले. त्या गावातील विकासकामांची दखल घेऊन केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाने एक डॉक्युमेंटरीही तयार केली.