सचिन पायलट जाणार भाजपात, आई रमा यांनी घडवून आणल्या पडद्यामागील हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 05:04 AM2020-07-15T05:04:31+5:302020-07-15T06:11:02+5:30
सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांनी फेब्रुवारीमध्ये नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : राजस्थानचे बडतर्फ उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट हे भाजपात जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यांनी आज केलेल्या एका ट्विटमधूनही याचे संकेत मिळाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटचा शेवट ‘राम राम सा’ या राजस्थानी पारंपरिक अभिवादनाने केला आहे.
सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांनी फेब्रुवारीमध्ये नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करणार असाल तर आपण भाजपात यायला तयार आहोत, असे त्यांनी तेव्हा नड्डा यांना सांगितले होते.
काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने सचिन पायलट यांनी पाच वर्षे मेहनत घेतली होती. तथापि, ऐनवेळी त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आल्यामुळे रमा पायलट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रचंड नाराज झाल्या होत्या. उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदही सचिन यांच्याकडे राहील, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी दिली होती. तथापि, त्याने रमा यांचे समाधान झाले नव्हते.
सचिन पायलट यांनी पूर्व राजस्थानात मीना-गुज्जर यांचे मनोमीलन घडविल्याने भाजपाला राजस्थानातील सत्ता गमवावी लागली होती. तेथील ४९ पैकी ४२ जागा भाजपाने गमावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपाला रमा पायलट यांचा प्रस्ताव लाभदायक होता. तथापि, तेव्हा नड्डा यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला होता. पक्षांतर्गत चर्चा होणे आवश्यक होते. आरएसएसच्या नेतृत्वालाही विश्वासात घेणे आवश्यक होते. त्यातच २४ मार्च पासून लॉकडाऊन लागले. सर्व राजकीय हालचाली ठप्प झाल्या.
राज्यसभा निवडणुकीत आमदारांना लाच दिल्याच्या आरोपावरून सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील स्पेशल आॅपरेशन ग्रुपने (एसओजी) नोटीस बजावल्यानंतर भाजपा पुन्हा सक्रिय झाली. प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने गेहलोत यांच्या व्यावसायिक मुलाच्या दहा ठिकाणांवर धाडी टाकल्या. आता ही लढाई पायलट आणि गेहलोत यांच्यापुरती मर्यादित न राहता भाजपा आणि गेहलोत-गांधी यांच्यातील लढाई बनली.