कोच निवडीसाठी सचिन, सौरव, लक्ष्मणने मानधन मागितल्याचं वृत्त निराधार: बीसीसीआय
By admin | Published: June 11, 2017 09:24 PM2017-06-11T21:24:34+5:302017-06-11T21:27:57+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण या त्रिमूर्तीने प्रशिक्षक निवडीच्या कामासाठी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण या त्रिमूर्तीने प्रशिक्षक निवडीच्या कामासाठी मानधन मागितल्याचं वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खोडून काढलं आहे. हे वृत्त निराधार आणि पूर्णतः चुकीचं असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. या त्रिमूर्तीने प्रशिक्षक निवडीच्या कामासाठी मानधन मागितल्याच्या वृत्तानंतर तिघांवर जोरदार टीका झाली होती.
भारताच्या महान खेळाडूंबाबत छापून आलेलं वृत्त पूर्णपणे चुकीचं असून निराधार आहे. अशाप्रकारचं वृत्त येणं दुर्भाग्यपूर्ण आहे असं बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं.
भारतीय टीम सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यामध्ये व्यस्त आहे, तर बीसीसीआयच्या नजरा संघाच्या खेळासोबतच संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेईल. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण या त्रिमूर्तीने प्रशिक्षक निवडीच्या कामासाठी बीसीसीआयकडे मानधन मागितल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं होतं.
जगमोहन दालमिया हे बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी सल्लागार समितीची स्थापना केली होती. खेळाने जे आपल्याला दिले आहे ते आपण परत करायला हवे, हे मनाशी ठरवून दालमिया यांनी या तिन्ही दिग्गज फलंदाजांची या समितीमध्ये निवड केली होती. सध्याच्या घडीला गांगुली आणि लक्ष्मण हे सल्लागार समितीमधील सदस्य बीसीसीआयच्या समालोचकांच्या चमूतही आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. त्यांच्या स्थानी प्रशिक्षकपदासाठी दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. कुंबळे यांनाही प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी, इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे, भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.