सचिनचे भाषण गोंधळात गेले राहून, राज्यसभेच्या पिचवर विक्रमादित्याला नाही उघडता आले खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:00 AM2017-12-22T02:00:41+5:302017-12-22T02:00:59+5:30
सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला. पण त्याला बोलताच आले नाही. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचार कोणालाच ऐकायला मिळाले नाहीत.
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला. पण त्याला बोलताच आले नाही. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचार कोणालाच ऐकायला मिळाले नाहीत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीविषयी संशय व्यक्त करणारे विधान पंतप्रधान मोदींनी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारपासून गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे वा निराधार आरोपांबद्दल माजी पंतप्रधानांसह संबंधितांची माफी मागावी असा विरोधकांचा आग्रह आहे. सभापती व्यंकय्या नायडूंनी सुरुवातीला हा अडथळा दूर करण्यासाठी सभागृह नेते अरुण जेटलींवर जबाबदारी सोपवली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. पंतप्रधानांनी ना स्पष्टीकरण दिले ना माफी मागितली.
त्यामुळे राज्यसभेतला गोंधळही थांबलेला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे पहिलेवहिले भाषणही वाहून गेले. राज्यसभेवर २0१२ साली नामनियुक्त झाल्यानंतर सभागृहात सचिनचे हे पहिलेच भाषण ठरणार होते. क्रीडा क्षेत्राची स्थिती, आॅलिम्पिक खेळांसाठी देशाची तयारी, भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेचे चांगले प्रदर्शन कसे होईल, यासह खेळण्याचा अधिकार या विषयावर बोलण्यासाठी सचिन तयारी करून आला होता.
दीर्घ आजार व आर्थिक चणचण असलेले भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू मोहम्मद शाहिद यांचे उदाहरण देत आंतरराष्ट्रीय खेळात चांगले प्रदर्शन करणाºया भारतीय खेळाडूंना केंद्राच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी आॅक्टोबरमध्ये सचिनने पंतप्रधान मोदींना एक पत्रही लिहिले होते. मात्र आरोग्य मंत्रालयाने सुविधा देण्यास असमर्थता व्यक्त केली होती, असे समजते.
दोघांच्या अनुपस्थितीचीच चर्चा अधिक-
राज्यसभेत सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीचा वारंवार उल्लेख झाला आहे. त्या दोघांची सदस्यता रद्द करण्याची मागणीही सभागृहात झाली. त्या दोघांची २0१२ साली निवड झाली. तेव्हापासून आजतागायत संसदीय कामकाजाच्या ३४८ दिवसांत सचिन २३ दिवस तर रेखा १८ दिवस सभागृहात काही काळासाठी उपस्थित राहिले. संसदेबाहेर तेंडुलकरने दत्तक ग्राम योजना आदी उपक्रमात विशेष रस घेतला आहे.