१० दहशतवाद्यांचा खात्मा करून बलिदान!

By admin | Published: September 6, 2015 04:56 AM2015-09-06T04:56:11+5:302015-09-06T04:56:11+5:30

‘जिंकू किंवा मरू’ या दृढनिश्चयासह देशाच्या शत्रूवर तुटून पडणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या परंपरेत भारतीय लष्कराच्या विशेष कमांडो पथकाचे लान्स नाईक मोहननाथ

Sacrifice by killing 10 terrorists! | १० दहशतवाद्यांचा खात्मा करून बलिदान!

१० दहशतवाद्यांचा खात्मा करून बलिदान!

Next

श्रीनगर : ‘जिंकू किंवा मरू’ या दृढनिश्चयासह देशाच्या शत्रूवर तुटून पडणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या परंपरेत भारतीय लष्कराच्या विशेष कमांडो पथकाचे लान्स नाईक मोहननाथ गोस्वामी यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे. भावी पिढ्यांसाठी शौर्य आणि पराक्रमाची प्रेरणादायी वीरगाथा मागे सोडून हौतात्म्य पत्करण्यापूर्वी लान्स नाईक गोस्वामी यांनी तब्बल १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि एकाला जिवंत पकडले.
वयाची जेमतेम तिशी उलटलेल्या या शूरवीराला काश्मीरच्या हंदवारामध्ये गुरुवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या तुंबळ चकमकीत वीरमरण आले. गेल्या ११ दिवसांच्या अत्यंत कमी कालावधीत दहशतवादाविरुद्ध लढ्यात त्यांनी १० दहशतवाद्यांचा खात्मा करून अत्युच्च शौर्याची प्रचिती दिली आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणाची आहुती दिली.
उधमपूरमधील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी सांगितले की, लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांनी मागील ११ दिवसांत काश्मीर खोऱ्यात तीन दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभागी होत १० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले तर एकाला जिवंत पकडले होते. ते इ.स. २००२पासून लष्कराच्या पॅराकमांडो दलात सहभागी होते. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या तुकडीच्या सर्व मोहिमांमध्ये हिरिरीने भाग घेतला होता; आणि त्यापैकी अनेक मोहिमा यशस्वीही ठरल्या. लान्स नाईक गोस्वामी लष्कराच्या दहशतवादीविरोधी कमांडो दलात स्वत:हून दाखल झाले. जगातील सर्वोत्तम अशी ख्याती असलेल्या या दलातही गोस्वामी यांनी असीम निडरपणा आणि पराकोटीच्या कर्तव्यदक्षतेने स्वत:चे नाव कमावले. त्यांच्या तुकडीस कोणत्याही कामगिरीचा हुकूम झाला की त्यात सहभागी होण्यासाठी गोस्वामी नेहमी आतुर असायचे. लान्स नायक गोस्वामी हे नैनीतालच्या हल्दवानी तालुक्यातील इंदिरानगरचे रहिवासी होते. त्यांच्यापश्चात पत्नी आणि सात वर्षांची चिमुकली आहे. त्यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने बरेलीस धाडण्यात आले आहे. ते पुढे हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी नेले जाईल व तेथेच संपूर्ण लष्करी इतमामाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. (वृत्तसंस्था)

असा गाजवला पराक्रम
१ आॅगस्ट २३ : खुरमूर, हंदवारा.. पाकिस्तान समर्थीत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान.
२आॅगस्ट २६ व २७ : लष्करच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा. याच मोहिमेत पाकिस्तानच्या मुजफ्फरगड येथे राहणारा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सज्जाद अहमद उर्फ अबू उबैदुल्ला जिवंत हाती लागला.
३सप्टेंबर ३ : कूपवाडाजवळील हफरुद येथील घनदाट जंगल. चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडून हौतात्म्य पत्करले.

Web Title: Sacrifice by killing 10 terrorists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.