इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान
By admin | Published: July 4, 2017 12:35 PM2017-07-04T12:35:10+5:302017-07-04T13:58:30+5:30
हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळास पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.4- भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित होण्याला यंदा 25 वर्षे पुर्ण होत आहेत. याच महत्त्वाच्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देत आहेत. आजपासून सुरु झालेल्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान तेथील भारतीय वंशाचे ज्यू बांधव, अनेक उद्योगांचे अध्यक्ष तसेच तेल अविव, जेरुसलेम या महत्त्वाच्या शहरांना भेट देणार आहेत. याबरोबरच हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळ आणि स्मशानासही ते भेट देतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटीश लष्करासाठी भारतीय जवान लढत असताना त्यांना इस्रायलमध्ये वीरगती प्राप्त झाली होती. 1918 साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही 23 सप्टेंबर रोजी "हैफा डे" साजरा करते.
1918 साली झालेल्या हैफा लढाईस लवकरच 100 वर्षे पुर्ण होत आहेत. प्राण गमावलेले भारतीय जवान आजही हैफामध्येच चिरनिद्रा घेत आहेत. 1922 साली या लढाईच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि जोधपूर, म्हैसूर, हैदराबाद संस्थानातील जवांनांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून नवी दिल्लीमध्ये तीन मूर्ती हे स्मृतीस्थळ बांधण्यात आले. या रस्त्याचे नाव अाता "तीन मूर्ती हैफा" असे करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
23 सप्टेंबर 1918 रोजी जोधपूर आणि म्हैसूर आणि संस्थानातील जवान असलेल्या ब्रिटीश लष्कराच्या 15 व्या घोडदळाने तुर्की ऑटोमन आणि जर्मन फौजांवर आक्रमक हल्ला केला. ऑटोमन सैन्याकडे त्यावेळेस उत्तम प्रकारच्या मशिनगन्स होत्या मात्र केवळ तलवारीआणि घोडेस्वारीच्या मदतीने भारतीय जवानांनी हैफाची ऑटोमन्सच्या तावडीतून मुक्तता केली. या अशाप्रकारच्या अचाट युद्धकौशल्याचे कौतुक आजही जगभरामध्ये केले जाते. या लढाईमध्ये भारतीयांनी 1350 जर्मन आणि ऑटोमन सैनिकांना बंदी बनवले तर आठ भारतीय जवानांना वीरमरण आले. मेजर दलपत सिंह यांना हिरो ऑफ हैफा अशा उपाधीने संबोधले जाते. या लढाईमध्ये दलपत सिंह यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचा मिलिटरी क्रॉस सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता. आजही इस्रायली नागरिक या युद्धाचे आणि बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांचे स्मरण करतात. हैफा डे देखिल तेथे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या युद्धाचा उल्लेख तेथिल पाठ्यपुस्तकांमध्येही करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान भेटणार भारतीय वंशाच्या ज्यू बांधवांना
आज इस्रायलला रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या तेल अविवमध्ये भारतीय वंशाच्या ज्यू बांधवांची भेट घेणार आहेत. एक्झिबिशन्स गार्डन येथे होणाऱ्या या भेटीमध्ये सुमारे 4000 हून अधिक लोक उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. याबरोबरच मक्काबी ऑलिम्पिक्ससाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंनाही पंतप्रधान भेटणार आहेत.