तबला अबोल; ‘उस्ताद’ झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीतविश्वावर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:53 IST2024-12-17T05:52:16+5:302024-12-17T05:53:19+5:30
तबलावादन क्षेत्रात सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कलेमुळे सर्वांना मंत्रमुग्ध केले.

तबला अबोल; ‘उस्ताद’ झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीतविश्वावर पसरली शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जागतिक कीर्तीचे तबलावादक, तालतज्ज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले झाकीर हुसेन यांचे अमेरिकेतील सॅनफ्रान्सिको येथील रुग्णालयामध्ये सोमवारी पहाटे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. फुप्फुसाच्या दुर्धर आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तबलावादन क्षेत्रात सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कलेमुळे सर्वांना मंत्रमुग्ध केले.
भारतीय शास्त्रीय संगीत, वाद्यवादन या क्षेत्रात ज्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली, त्यामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांनी तबलावादनाबरोबरच अभिनय, मॉडेलिंग या क्षेत्रातही कामगिरी बजावली होती. त्यांनी काही संगीतरचनाही केल्या होत्या. त्यांना फुप्फुसाचा एक आजार झाला होता.
ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. झाकीर हुसेन यांच्या प्रकृतीबद्दल रविवार रात्रीपासून सोशल मीडियावर विविध प्रकारची चर्चा सुरू होती. मात्र, अनेकांच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली. हुसेन यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर करताच असंख्य संगीतप्रेमी शोकाकुल झाले.
तबलावादनाने रसिकांना मोठा आनंद दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तबलावादन हे झाकीर हुसेन यांनी जगभरात लोकप्रिय केले. त्यांनी वादनकौशल्याने असंख्य लोकांची मने जिंकली. त्यांनी भारतीय व पाश्चिमात्य संगीतातील गोष्टींचा मेळ साधला होता. त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून रसिकांना मोठा आनंद दिला.
भारतीय, पाश्चिमात्य संगीताला जोडणारा दुवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सांगितले की, उस्ताद झाकिर हुसेन हे भारतीय शास्त्रीय संगीत व पाश्चात्य संगीत यांना जोडणारा दुवा होते. त्यांचा भारत सरकारने पद्मविभूषण किताब प्रदान करून गौरव केला होता. त्यांचे निधन ही अतिशय दु:खद घटना आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, झाकीर हुसेन यांच्या तबलावादनात विलक्षण जादू होती. त्यांच्या लोकप्रियतेला देशांच्या सीमांचे बंधन नव्हते.