Sadabhau Khot: “राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय, पाणी प्रश्न दूर करणार”: सदाभाऊ खोतांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 04:27 PM2022-01-01T16:27:57+5:302022-01-01T16:28:46+5:30
Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
जयपूर: देशभरातील शेतकरी बांधवांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अलीकडेच वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगितले जात आहे. यातच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, पाणी प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सदाभाऊ खोत यांनी दिले.
राजस्थान येथील किसनपुरा जि.पाली येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. येथील शेतकरी बांधवांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राजस्थान राज्यातील शेतकरी बांधवांनी अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेकडो एकर शेती असूनही ती पाणी नसल्यामुळे पिकवू शकत नाहीत. आगामी काळात शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी देण्याबाबत भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.
राजस्थानातील शेतकरी प्रचंड कष्टाळू
राजस्थानधील किसानपुरा येथील शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राजस्थानातील शेतकरी बांधव प्रचंड कष्टाळू आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे त्यांना शेती करता येत नाही. येथील शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी द्या. त्या शेतीमधून आम्ही सोने पिकवू. भविष्यात यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटना देखील उभारेन, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.