बापरे! आईच्या मृत्यूमुळे 'तो' दु:खी झाला; तब्बल 1.3 कोटींची BMW कार नदीत फेकून आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:52 PM2022-05-28T19:52:27+5:302022-05-28T19:53:19+5:30
बंगळुरूत राहणाऱ्या एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे.
नवी दिल्ली - देशात अनेक अजब-गजब घटना समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना आता घडली आहे. एका तरुणाने आपली बीएमडब्ल्यू कार चक्क नदी फेकल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसांसह स्थानिकही हैराण झाले आहे. सुरुवातीला सर्वांना चुकून गाडी नदीत पडली की काय असं वाटलं. पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं आहे. बंगळुरूत राहणाऱ्या एका तरुणाने स्वत: आपली कार नदीत फेकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या अचानक झालेल्या निधनामुळे तरुण खूप उदास झाला होता. यानंतर त्याने आपली बीएमडब्ल्यू कार नदीत फेकून दिली. स्थानिकांना नदीत अर्धवट अडकलेली बीएमडब्ल्यू एक्स6 कार दिसली. याची किंमत तब्बल 1.3 कोटी रुपये आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितलं. सुरुवातील पोलिसांना वाटलं की, गाडीत कोणीतरी असावं, मात्र काही वेळानंतर गाडीत कोणीच चालक नसल्याचं कळालं आणि पोलिसांनी कार बाहेर काढली.
परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कारबाबत अधिक माहिती मिळवली. यात कळालं की, कारचा मालक बंगळुरूतील महालक्ष्मी लेआउटचा निवासी आहे. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. आईच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितलं.
दुःखातून बाहेर पडू न शकल्याने तो आपल्या कारने श्रीरंगपटना येथे आला आणि बंगळुरूला परत येण्यापूर्वी निराशेत त्याने कार नदीत फेकली. श्रीरंगपट्टणाचे उपनिरीक्षक पुनीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांच्या साक्षीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबाने कार परत बंगळुरूला नेली. या घटनेसंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.