मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 03:46 PM2022-07-09T15:46:09+5:302022-07-09T15:47:23+5:30
Sadhna Gupta : साधना गुप्ता गेल्या 15 दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले. साधना गुप्ता यांच्यावर गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. याआधी त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने गुडगावला आणण्यात आले, त्यानंतर आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
साधना गुप्ता गेल्या 15 दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्या अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. मुलायम सिंह यादवही त्यांची सतत काळजी घेत होते. मुलायम सिंह यादव आज सकाळीच पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आज त्यांचे निधन झाले. दिल्लीहून चार्टर्ड विमानाने त्यांचे पार्थिव लखनऊला नेण्यात येणार आहे.
साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. 1980 मध्ये त्यांची पहिल्यांदा मुलायम सिंह यादव यांच्यासोबत भेट झाली होती. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. पण, त्या आपल्या पतीसोबत जास्त काळ राहिल्या नाहीत आणि चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे लग्न झाले. साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या.