अत्याचारांपासून वाचण्यासाठी मुस्लिम मुलींनी हिंदूशी लग्न करावं, भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:24 PM2018-08-02T15:24:38+5:302018-08-02T15:24:54+5:30
उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे.
नवी दिल्ली - उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे. हलाला आणि तिहेरी तलाक प्रथेपासून वाचण्यासाठी मुस्लिम तरुणींनी धर्म बदलून हिंदू तरुणांसोबत लग्न केले पाहिजे, असा अजब सल्ला साध्वी प्राची यांनी दिला आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, ''इस्लाम धर्म कुप्रथांनी भरलेला आहे, अशा परिस्थितीत धर्म परिवर्तन करुन हिंदूंसोबत लग्न केले तर हलालासारख्या वेदनादायी प्रथांपासून बचाव होऊ शकतो. हिंदू धर्मात स्वतःचा समावेश करुन मुस्लिम महिला आयुष्यभरासाठी अत्याचार आणि धमक्यांपासून स्वतःला वाचवू शकतात''.
साध्वी इथेच थांबल्या नाही तर पुढे असाही सल्ला दिला की, हिंदू समाजात तिहेरी तलाक किंवा हलालाचा देखील कोणता त्रास नाही. हिंदू धर्मामध्ये विवाह केल्यास तुमचे चांगल्या संस्कारासहित स्वागत होईल. तिहेरी तलाकसंदर्भात साध्वी प्राची म्हणाल्या की, हलाला किंवा धर्मातून बहिष्कृत करण्याची धमकी देणाऱ्या मौलवींना पीडित महिलांनी चपराक लगावली पाहिजे. समाज गलिच्छ करण्याचं काम करणाऱ्या अशा मौलवींना शिक्षा झाली पाहिजे''
दरम्यान, साध्वी प्राची यांच्या विधानामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. त्यांच्या विधानाला विरोध दर्शवत देवबंदी उलमानं म्हटलंय की, सर्व धर्माचे आपापले वैयक्तिक कायदे असतात, त्यानुसार सर्व जण आपापले आयुष्य जगतात. त्यामुळे हा आमच्या समाजाची बदनामी करण्याचा कट आहे.
एकूणच साध्वी प्राची यांनी उलटसुलट विधान करत नवीन वाद निर्माण केला आहे.