Video : नथुराम गोडसेच्या विधानावरून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 08:38 AM2019-05-17T08:38:28+5:302019-05-17T08:56:18+5:30
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे.
नवी दिल्ली - भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला. 'त्या' विधानावरून भाजपाने हात वर केले होते. त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असं म्हटलं आहे.
Pragya Thakur apologises for 'Godse true patriot' remark, says Mahatma Gandhi's sacrifice cannot be forgotten
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2019
Read @ANI Story | https://t.co/tF8eICkppcpic.twitter.com/QqHwLbHodL
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ''नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते.
'साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी' असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं होतं. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं.