प्रज्ञा सिंह यांचा माफीनामा, 21 तास पाळणार मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:10 PM2019-05-20T15:10:30+5:302019-05-20T22:25:33+5:30
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागत 21 तास मौन व्रत करणार असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला. 'त्या' विधानावरून भाजपाने हात वर केले होते. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं होतं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली होती. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी माफी मागत 21 तास मौन व्रत करणार असल्याचं म्हटलं आहे.
'मतदान संपल्यानंतर आता चिंतन सुरू आहे. निवडणुकीदरम्यान जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दु:ख झालं असेल तर मी माफी मागते आणि त्याचं प्रायश्चित म्हणून 21 तास मौन पाळणार आहे' असं ट्वीट प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानावरून भाजपची डोकेदुखी वाढत आहे. 17 एप्रिलला भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा यांनी एका महिन्यात 3 वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत.
चुनावी प्रक्रियाओ के उपरान्त अब समय है चिंतन मनन का,
— Sadhvi Pragya Official (@SadhviPragya_MP) May 20, 2019
इस दौरान मेरे शब्दों से समस्त देशभक्तों को यदि ठेस पहुंची है तो मैं क्षमा प्रार्थी हूँ और सार्वजनिक जीवन की मर्यादा के अंतर्गत प्रयश्चित हेतु 21 प्रहर के मौन व कठोर तपस्यारत हो रही हूं।
हरिः ॐ
नथुराम गोडसेच्या विधानावरून प्रज्ञा सिंह यांनी 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असं म्हटलं आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा त्यांनी देशभक्त असा उल्लेख केला आहे. ''नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील. जे लोक त्याला दहशतवादी म्हणतात. त्यांनी स्वत:मध्ये एकदा डोकावून पाहावे. या निवडणुकीमधून अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे, असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले होते.
भाजपची डोकेदुखी ; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एका महिन्यात ३ वेळा वादग्रस्त वक्तव्य
'प्रज्ञा सिंह यांच्या त्या मताशी भाजपा सहमत नाही. आम्ही त्या विधानाचा निषेध करतो. तसेच प्रज्ञा सिंह यांच्याकडून भाजपा यासंदर्भात खुलासा मागणार असून, त्यांनी आपल्या विधानाची माफी मागावी' असं भाजपाचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं होतं. दरम्यान, प्रज्ञा सिंह यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. त्यावेळीही त्यांना त्या विधानावरून विरोधकांनी धारेवर धरलं होतं.