दिग्विजय सिंह 'दहशतवादी', साध्वी प्रज्ञा सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 07:59 PM2019-04-25T19:59:51+5:302019-04-25T20:04:04+5:30
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवारसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहशतवादी म्हटले आहे. पुन्हा एकदा दहशतवाद्याचा नायनाट करण्यासाठी एका संन्यासीनीला निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.
सीहोर येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, " राज्यात 16 वर्षांपूर्वी उमा दिदी (उमा भारती) यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे 16 वर्षापर्यंत ते डोकं वर काढू शकले नव्हते. त्यांना राजकारण ही करता आले नाही. आता पुन्हा त्यांनी डोकं वर काढले तर त्यांना पुन्हा एका संन्यासीनीसोबत सामना करावा लागत आहे. हे त्यांच्याच कर्माचंच फळ आहे."
याआधी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या होत्या, वाचा त्यांच्याच भाषेत.....
"वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा."
"ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए."
"मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात माजी पोलीस अधिकारी रिंगणात
मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने एल्गार पुकारला आहे. रियाजउद्दीन देशमुख असं या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव असून देशमुख यांनी भोपाळमधून प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. देशमुख सध्या औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे.