साध्वी प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य घृणास्पद, त्यांना कधीही मनाने माफ करणार नाही - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 03:11 PM2019-05-17T15:11:14+5:302019-05-17T15:11:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. साध्वी यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी न्यूज 24 या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पहिल्यांदात जाहीर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले विधान घृणास्पद आहे. टीका करण्याच्या योग्यतेचे आहे. सभ्य समाजामध्ये अशा प्रकारची वक्तव्ये होता कामा नयेत. त्यांनी माफी मागितली आहे. मात्र मी त्यांना कधीही मनाने माफ करू शकणार नाही,''
दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते.
मात्र नथुरामबाबतच्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती. 'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागताना म्हटले होते.