आधी सुरक्षा, नंतरच गगनयान...; मोहीम घाईगर्दीने राबविणार नाही: इस्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:37 AM2023-06-09T05:37:37+5:302023-06-09T05:37:54+5:30
गगनयान मोहिमेची २०२२मध्ये अंमलबजावणी होणे अपेक्षित होते.
बंगळुरू: अवकाशात भारतीय अंतराळवीर पाठविण्यासाठी देशाने स्वबळावर आखलेली गगनयान मोहीम आम्ही घाईगर्दीने राबविणार नाही असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे. गगनयान ही मोहीम सुरक्षित व शंभर टक्के यशस्वी व्हावी याच दृष्टीने आम्ही पुढील पावले टाकत आहोत असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.
अग्नि प्राइम या क्षेपणास्त्राची ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर गुरुवारी डीआरडीओ या संस्थेने यशस्वी चाचणी केली. नवीन तंत्रज्ञानाने युक्त असलेले अग्नी प्राइम हे लक्ष्यावर अचूक मारा करते. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओ व संरक्षण दलांचे अभिनंदन केले.
का झाला उशीर?
गगनयान मोहिमेची २०२२मध्ये अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या साथीमुळे ही मोहीम राबविण्यास विलंब झाला. स्पेसक्राफ्ट मिशन ऑपरेशन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान एस. सोमनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गगनयान मोहिमेसंदर्भातील आमच्या विचारांत काही बदल झाला आहे. इतक्या महत्त्वाच्या मोहिमेबाबत घाईने कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत असे आम्ही ठरविले आहे.
सर्व चाचण्या यशस्वी
गगनयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावी यादृष्टीने भारत तयारी करीत आहे. त्यासाठी पहिले महत्त्वाचे पाऊल येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये उचलण्यात येईल. या मोहिमेसाठी लागणाऱ्या इंजिनांच्या सर्व आठ चाचण्या इस्रोने यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत असेही एस. सोमनाथ यांनी सांगितले.