बापरे! 'त्या' लॉकर्समध्ये पुन्हा सापडली 1.25 कोटींची रोकड; नोटांचे बंडल पाहून उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:43 PM2023-11-08T16:43:11+5:302023-11-08T16:45:28+5:30
प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात ही रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये सापडली आहे.
राजस्थानच्या जयपूरमधील गणपती प्लाझा येथे असलेल्या रॉयरा सेफ्टी वॉलेट्स कंपनीच्या खासगी लॉकर्सवर आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. आयकर विभागाने रॉयरा सेफ्टी वॉलेट आणि दोन खासगी लॉकरमधून 1 कोटी 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात ही रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये सापडली आहे. गणपती प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या लॉकर्सना आयकर विभागाने उच्च जोखमीच्या श्रेणीतील लॉकरमध्ये लिस्टेड केलं आहे.
लॉकर्स ऑपरेट करण्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या मालकांना नोटीस बजावून तपासात सहकार्य करण्यास सांगितलं होतं. परंतु लॉकर्सचे केवायसी अपूर्ण असल्याने योग्य मालकाची माहिती मिळू शकली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लॉकर चालवणाऱ्या लॉकर मालकाला बोलावून आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. आतापर्यंत गणपती प्लाझाच्या लॉकर्समधून आयकर विभागाला एकूण आठ कोटींहून अधिक रोकड मिळाली आहे.
लॉकर्समध्ये सात कोटींचं सोनं सापडलं
सात कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उच्च जोखमीच्या श्रेणीतील लॉकर चालवण्यासाठी आयकर विभाग आयकर कायद्यांतर्गत कारवाई करत आहे. लॉकर्सच्या मालकांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे. अनेक लॉकर्स उघडणं अद्याप बाकी आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी नुकताच दावा केला होता की, या लॉकर्सची झडती घेतल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेनामी काळा पैसा सापडू शकतो. त्यानंतर आयकर विभागाने या लॉकर्सची चौकशी सुरू केली. येथे 1100 लॉकर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.