मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप; निवडणूक आयोगानं मागवला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 05:40 PM2019-04-11T17:40:18+5:302019-04-11T17:47:26+5:30
पोलिसांकडून नमो फूड पॅकेट्सचं वाटप झाल्यानं वाद
नोएडा: लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना नोएडात मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं. गौतम बुद्ध नगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गौतम बुद्ध नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला की नाही, याबद्दलचा तपास मुख्य निवडणूक अधिकारी करणार आहेत.
गौतम बुद्ध नगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी यामध्ये काही गैर नसल्याचं सांगितलं. मतदान केंद्राजवळ वाटण्यात आलेल्या फूड पॅकेट्सचा भारतीय जनता पार्टीशी संबंध नसल्याचं ते म्हणाले. भाजपाच्या प्रचार अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अनेकदा नमो असा केला जातो. त्यामुळे ही फूड पॅकेट्स भाजपाकडून वाटण्यात आली, अशी चर्चा होती. 'राजकीय पक्षाच्या वतीनं पोलिसांकडून खाद्यपदार्थांच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याची माहिती काहीजणांनी पसरवली. ती अतिशय चुकीची आहे. ते खाद्यपदार्थ नमो फूड शॉपमधून मागवण्यात आले होते. त्यामुळे त्यावर नमो असा उल्लेख होता. मात्र काहींनी जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवली. एखाद्या दुकानातून पदार्थ खरेदी करू नका, अशी कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही,' असं वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितलं.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये काहीच चूक नसल्याचं सांगितलं. 'एखाद्या दुकानातून घेतलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या बॉक्सवर दुकानाचं नाव असतं. त्या नावाचा कोणी दुसरा अर्थ घेऊ नये. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनी खायला हवं की नको?', असं जिल्हा दंडाधिकारी म्हणाले. विशेष म्हणजे यानंतर काही पत्रकार नमो फूड शॉपमध्ये पोहोचले. तेव्हा त्यांना दुकानातून पॅकेट्स पाठवण्यात न आल्याची माहिती मिळाली. 'आम्हाला या ऑर्डरबद्दल काहीही कल्पना नाही. आमचं दुकान बुधवार दुपारपासून बंद आहे,' अशी माहिती नमो फूड शॉपच्या कर्मचाऱ्यानं दिली.