हिजाब विरुद्ध भगवा वाद चिघळला; अनेक ठिकाणी निदर्शने, कर्नाटकातील शिक्षणसंस्था तीन दिवस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:25 AM2022-02-09T07:25:22+5:302022-02-09T07:26:53+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
बंगळुरू : कर्नाटकमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद चिघळला आहे. ही परिस्थिती पाहता, राज्यातील सर्व शिक्षणसंस्था ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिजाब बंदीवरून कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली. हिजाब बंदीचे प्रकरण न्यायलयात गेले असून, याप्रकरणी न्यायालयाने बुधवारपर्यंत सुनावणी तहकूब केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शिमाेगातील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या जागेवर भगवा ध्वज फडकावितानाचा व्हिडिओ समाेर आला आहे. इथे दगडफेकीनंतर जमावबंदी लागू केली आहे, तर उडुपि येथे हिजाब घातलेल्या मुलींनी महाविद्यालयात प्रवेश केला. त्याचवेळी भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळलेली काही मुले आणि मुली तेथे दाखल झाले. दाेन्ही गटांमध्ये वादावादी झाली. बागलकाेटमध्येही दगडफेक झाली. त्यानंतर पाेलिसांना लाठीमार करावा लागला. हा वाद वाढत असल्याचे पाहून राज्य सरकारने तीन दिवस सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.
काय आहे वाद?
- उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला हाेता.
- त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.