Saffron Flag on Mosque: कर्नाटकातील मशिदीवर लावला भगवा झेंडा; हिंदू-मुस्लिम बांधवांनी शांततेने हाताळले प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:17 PM2022-05-11T16:17:22+5:302022-05-11T16:17:28+5:30
Saffron Flag on Mosque: कर्नाटकतील बेलागावी जिल्ह्यातील सत्तीगिरे गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
Saffron Flag on Mosque in Karnataka: मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरुन अजान देण्याच्या विरोधात महाराष्ट्रातून सुरू झालेले आंदोलन आता कर्नाटकात पोहोचले आहे. येथेही लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात एका मशिदीवर भगवा ध्वज फडकल्याची घटना समोर आली आहे. हा ध्वज उतरवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी झेंडा पाहिला
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सत्तीगिरे गावातील मशिदीत पहाटे भगवा ध्वज फडकताना दिसला. हे गाव बेळगावच्या मुदलगी तालुक्यात असून, सकाळी नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी हा झेंडा पाहिला. परिसरातील वाढता तणाव पाहून मुस्लिम आणि हिंदू दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रकरण आणखी चिघळण्याआधीच हाताळले. यानंतर भगवा ध्वज उतरवण्यात आला. सध्या परिसरात शांतता असून खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आरोपींच्या शोधात
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ध्वज लावणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. पोलीस मशिदीच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करत होते, मात्र अद्याप काहीही सापडले नाही. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
चर्चवरही भगवा ध्वज फडकवण्यात आला
यापूर्वी कर्नाटकातील कडबा येथील चर्चवर भगवा ध्वज फडकावल्याचे प्रकरण समोर आले होते. गेल्या आठवड्यात चर्चमध्ये काही काम सुरू होते आणि त्यादरम्यान काही लोकांनी तेथे भगवा ध्वज लावला. मात्र, नंतर पोलिसांनी ध्वज हटवून आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.