भाजपकडून महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहस्त्रबुद्धे व महात्मेंना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 06:42 PM2016-05-30T18:42:44+5:302016-05-30T18:42:44+5:30
भाजपच्या केंद्रीय निवड समितीनं आज राज्यसभेसह विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- भाजपच्या केंद्रीय निवड समितीनं आज राज्यसभेसह विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आंध्र प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपनं महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी विनय सहस्त्रबुध्दे आणि विकास महात्मे यांना संधी दिली आहे. झारखंडमधून महेश पोद्दार हे राज्यसभेवर जाणार आहेत. तर मध्य प्रदेशमधून भाजपनं एम. जे. अकबर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमधून शीव प्रताप शुक्ला यांना भाजपच्या केंद्रीय निवड समितीनं संधी दिली आहे.
विधान परिषदेसाठी भाजपनं मित्र पक्षांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे आणि भाजपचे मुंबईचे उपाध्यक्ष प्रवीण दरेकरांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भांडारींना डावलून मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकरांना उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. बिहारमधून भाजपनं विनोद नारायण झा, तर उत्तर प्रदेशमधून भूपेंद्र सिंग, दयाशंकर सिंग यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.