सहका-यांनीच मुख्य न्यायाधीशांना दिली धमकी
By admin | Published: May 11, 2015 02:53 AM2015-05-11T02:53:17+5:302015-05-11T02:53:17+5:30
मद्रास उच्च न्यायालयातील वादग्रस्त न्यायाधीश सी.एस. करनन यांनी मुख्य न्यायाधीश संजय कौल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देत विधी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सहकाऱ्यांनीच मुख्य न्यायाधीशांना दिली धमकी; मद्रास हायकोर्ट
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयातील वादग्रस्त न्यायाधीश सी.एस. करनन यांनी मुख्य न्यायाधीश संजय कौल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देत विधी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
विशेष म्हणजे न्या. करनन यांनी अनूसूचित जाती- जमाती अत्याचार निवारण कायद्यानुसारही (अॅट्रॉसिटी) खटला दाखल करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे जाण्याची धमकी दिल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे.
मुख्य न्यायाधीशांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या मुलकी न्यायाधीशांच्या निवडीबाबत काही त्रुटी आढळून आल्या असून मी स्वत:हून दखल घेत त्यांचा प्रशासकीय आदेश रोखत आहे, असे न्या. करनन यांनी १६ एप्रिल रोजी न्या. कौल यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. त्यांनी ३० एप्रिल रोजी आणखी एक विनास्वाक्षरी असलेले पत्र मुख्य न्यायाधीशांना पाठवत अवमानना खटला दाखल करण्याचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा आधार घेणार असल्याचा इशारा दिला.
मद्रास उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी आता न्या. करनन यांनी दिलेला आदेश रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ त्यावर सुनावणी करेल. (वृत्तसंस्था)'
दलित असल्यामुळे अवमानाचा आरोप
४न्या. करनन यांनी यापूर्वी नोव्हेंबर २०११ मध्ये मी दलित असल्यामुळे सहकारी न्यायाधीश लक्ष्य बनवित असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. दलित न्यायाधीश स्वत:च्या सन्मानासाठी समोर येतात तेव्हा त्यांना लक्ष्य बनवून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविला जातो, या त्यांच्या विधानावर त्याकाळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांनी गेल्यावर्षी जानेवारीमध्ये न्यायाधीशांच्या निवडीबाबत उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवरही टीका केली होती.