कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:25 PM2023-12-20T17:25:07+5:302023-12-20T17:27:04+5:30
Sahitya Akademi award : देशातील २४ भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो.
Sahitya Akademi Award : नवी दिल्ली : साहित्य विश्वातील अतिशय मानाचा मानला जाणारा 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या पुस्तकाला तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या 'वर्सल' या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यंदाचे साहित्य अकादमीचे पुरस्कार बुधवारी जाहीर झाले. देशातील २४ भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो. यावेळी यंदाचा हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार संजीव यांना त्यांच्या 'मुझे पाहानो' या कादंबरीसाठी देण्यात आला आहे. तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासराव यांनी हिंदी भाषेसोबतच त्यांनी इतर भाषांमधील विजेत्यांची नावेही जाहीर केली आहेत. या सर्वांना १२ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणी...
रिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे.नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची ओळख आहे. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
डॉ. प्रकाश पर्येकर यांचे "वर्सल" कथा संग्रह
कोकणी साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांना "वर्सल" या कथा संग्रहासाठी केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांना "इगडी,बिाडी, तिगडी, था" या बाल साहित्यासाठी साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला होता. डॉ. प्रकाश पर्येकर हे कोकणी साहित्यिक असून ते सत्तरी येथील आहे. त्यांचे लखेन हे ग्रामीण भूगोल, ग्रामीण संस्कृती तसेच तेथील लोकांवर आधारीत असते."वर्सल" हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात २० कथा एकत्र केल्या आहेत .९० च्या दशकात आणि विसाव्या दशकाच्या सुरुवातीस विविध कोकणीमध्ये प्रकाशनांमध्ये वर्सल चे प्रकाश झाले आहे. यातील अनेक कथांचे मराठी, हिंदी, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, उर्दू, ओडिया आदी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.