IPS अधिकारी असल्याचे भासवून केला विवाह; उकळला ४० लाखांचा हुंडा, ३५ तोळे दागिने अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:50 AM2023-01-13T10:50:18+5:302023-01-13T10:50:30+5:30
प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून संजय सिंग याने एका श्रीमंत घरातील मुलीशी विवाह केला.
आग्रा : प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून संजय सिंग याने एका श्रीमंत घरातील मुलीशी विवाह केला. त्याने वधुपक्षाकडून हुंड्याच्या रूपात ४० लाख रुपये रोख, एक आलिशान कार, ३५ तोळे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी मिळविल्या. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिले व प्रेयसीसोबत राहू लागला. मात्र तो तोतया आयपीएस अधिकारी आहे, हे लक्षात येताच वधुपक्षाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रणवीरसिंह याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आग्रा येथे राहणाऱ्या एका मुलीशी संजय याचा २०२१ मध्ये विवाह झाला होता.
प्रकरण मिटवण्यासाठी दिली लाच
आपल्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे, याचा सुगावा लागताच संजयने एत्मादौला ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाच देऊन आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी व्यवस्था केली. मात्र, त्याच्या सासऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, गेल्या मंगळवारी संजयला अटक करण्यात आली आहे.
सासऱ्यांना ठार मारण्याची धमकी
विवाह झाल्यानंतर संजय याने सासऱ्यांकडे फ्लॅटची मागणी केली. मात्र, पत्नीने विरोध केला. त्यामुळे त्याने तीला मारहाण करून घरातून हाकलून दिले. यानंतर संजयचे सासरे त्याला भेटण्यासाठी नॉयडाला गेले. पुन्हा भेट घ्यायचा प्रयत्न केला तर ठार मारण्याचीही धमकी त्याने सासऱ्यांना दिली. त्यामुळे सासऱ्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.