संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जोड व चौकटी
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:27+5:302015-07-10T23:13:27+5:30
Next
>संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातील मंदिरामध्ये स्पिकरवर अभंगवाणी लावण्यात आल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक -युवती, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठया आतुरतेने पालखीची वाट पाहत होते. सायंकाळी सात वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे फर्ग्युसन रस्त्यावर आगमन झाले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. पादुकांना स्पर्श करून दर्शन घेतल्यानंतर कृतकृत्य झाल्याची भावना भाविकांच्या चेहर्यावर दिसून येत होती.संत तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युसन रस्त्यावर आल्यानंतर वरूणराजाने हलक्या सरींचा वर्षाव करीत पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम पादुका मंदिराजवळ पालखी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात सायंकाळी सव्वा सात वाजता आरती करण्यात आली. हरीनामाचा जयघोष करीत पालखी पुढे सरकत होती. वारकर्यांना राजगिर्याचे लाडू, बिस्किट, पाणी यांचे वाटप केले जात होते. अभंग म्हणत, विठठ्लाचे गुणगाण करीत पालखी पुढे सरकत होती.चौकटअन् अश्रूंचा बांध फुटलासासू आणि सुन या दोघी मिळून पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर अचानक मोठी गर्दी झाली, या गर्दीत रानडे इन्टिटयूटजवळ थांबलेल्या सासू व सुना यांची तुटातुट झाली. दोघींनीही एकमेंकींची शोधाशोध सुरू केली. सासूचा मोबाइल सुनेच्याच पर्समध्ये असल्याने आणखीनच अडचण निर्माण झाली. सासू सापडत नसल्याने सुनबाई खूपच घाबरून गेल्या होत्या. डोळयात पाणी आणून त्या सासूचा शोध घेत होत्या. अखेर काही वेळाने सासूबाई त्यांना भेटल्या, त्यावेळी सूनेने खूप वेळापासून रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. दोघींनी एकमेंकींना गच्च मिठी मारली.................चौकटवाटपाच्या साहित्याची फेकाफेकीपालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकर्यांना वाटण्यासाठी अनेकांनी राजगिर्याचे लाडू, बिस्किट, पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या. पालखी आल्यानंतर मोठी गर्दी झाल्याने या साहित्याचे वाटप करण्यासाठी वारकर्यांपर्यंत पोहचता येईना. त्यावेळी राजगिर्याचे लाडू, बिस्किटचे पुडे दिंडीतील वारकर्यांच्या अंगावर फेकले जाऊ लागले. वारकर्यांना ते जोरात लागत होते, हा चुकीचा प्रकार यावेळी दिसून आला...............