तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो भाजपात
By हेमंत बावकर | Published: October 11, 2020 10:35 AM2020-10-11T10:35:25+5:302020-10-11T10:36:59+5:30
Saira Bano Triple Talaq : सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणारी महिला सायरा बानो हिने भाजपात प्रवेश केला आहे. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहणारी सायरा बानो हिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपाची सदस्यता घेतली.
सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी 23 फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. या कायदेशीर लढाईत न्यायालयाने तिहेरी तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला होता.
न्यायालयातील याचिकेत तिहेरी तलाकसह निकाह हलालावरही तिने आव्हान दिले होते. तसेच समाजातील एकापेक्षा जास्त विवाहच्या प्रथेवरही आवाज उठवत ही प्रथा संपविण्याची मागणी केली होती. सायराच्या म्हणण्यानुसार तिहेरी तलाक हे संविधानाच्या 14 आणि 15 अनुच्छेदानुरास मिळालेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. न्यायालयाने यावर 22 ऑगस्ट 2017 मध्ये निकाल देत सहा महिन्यांत संसदेत कायदा करण्याचे आदेश दिले होते.
भाजपात प्रवेश केल्यानंतर सायरा बानो हिने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विचार, नितीमुळे प्रेरित झाले आहे. मी यापुढेही महिलांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे.