प्रचारासाठी मराठी तारे अवतरले जमिनीवर
By admin | Published: October 12, 2014 02:40 AM2014-10-12T02:40:15+5:302014-10-12T02:40:15+5:30
बॉलिवुडचे नेहमी प्रचारात दिसणारे अनेक कलाकार यावेळी प्रचारापासून दूर असल्याची कबुली राजकीय पक्षाचे नेते देत आहेत.
Next
>संदीप प्रधान - मुंबई
विधानसभा निवडणुकीनंतर नेमकी कुठल्या पक्षाची सत्ता येईल याबाबत स्पष्टता नसल्याने बॉलिवुडचे नेहमी प्रचारात दिसणारे अनेक कलाकार यावेळी प्रचारापासून दूर असल्याची कबुली राजकीय पक्षाचे नेते देत आहेत. सलमान खान, शाहरूख खान, कॅतरिना कैफ यासारख्या आघाडीच्या कलाकारांनी सध्या आपली चित्रपटाची शुटींग सुरु ठेवली आहेत.
मराठी चित्रपटाला सध्या सुगीचे दिवस आले असून अनेक कलाकारांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी निकटचा संबंध आहे. त्यामुळे मनसेच्या 231 उमेदवारांच्या प्रचाराकरिता सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, संजय नाव्रेकर, महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचेत पाटील, भाऊ कदम, राजन भिसे, बाप्पा थोरात, वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक आदींनी सभा घेतल्या आहेत, अशी माहिती मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारांना आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, दिगंबर नाईक हे प्रचार करीत आहेत.
भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या प्रचारात विक्रम गोखले, मनोज जोशी व उर्मिला मातोंडकर यांनी भाग घेतला. काँग्रेसच्या उमेदवारांकरिता नगमा, अमृता खानविलकर, सुनील शेट्टी, शक्ती कपूर, कुनिका लाल यांनी भाग घेतला, अशी माहिती काँग्रेसच्या कॅम्पेन कमिटीचे आमदार मुजफ्फर हुसैन यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांचा अनेक बॉलिवुड कलाकारांशी निकटचा संबंध राहिला आहे. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आपल्या प्रचारात अमित सूद हे कलाकार सहभागी झाले. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर कुठल्या पक्षाचे सरकार येईल याबाबतचे चित्र स्पष्ट नसल्याने कदाचित कलाकार प्रचारात उतरले नसतील का, असे विचारता तशी शक्यता नाकारता येत नाही, असे अहिर म्हणाले.
मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारातही आतार्पयत बॉलिवुडचे कुणी स्टार उतरले नव्हते. मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एखाद्या उमेदवाराकरिता काही कलाकार उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्या तरी बॉलिवूडचे तारे जमिनीवर उतरले नाहीत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे नेते राजन भोसले यांनी दिली.