आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:35 IST2025-03-06T17:35:02+5:302025-03-06T17:35:37+5:30
सक्षणा सलगर या आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. निवडणूक काळात त्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात मोठं रान उठवलं होतं.

आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सलगर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर सोनिया दुहान यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होते. अखेर या पदावर आता सक्षणा सलगर यांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून राजकारणात आलेल्या सक्षणा सलगर या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आहेत. जाहीर सभांतून केल्या जाणाऱ्या आक्रमक भाषणांसाठी त्या ओळखल्या जातात. निवडणूक काळात त्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात मोठं रान उठवलं होतं.
सक्षणा सलगर यांचा राजकीय प्रवास
वयाच्या २१ व्या वर्षी सक्षणा सलगर २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. नंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची संधी मिळाली. २०१८ मध्ये तत्कालीन एकसंध असलेल्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठी गळती लागल्यानंतर तत्कालीन युती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सलगर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र झंजावाती प्रचार केला. मागील निवडणुकीतील झंजावाती प्रचारामुळेच सक्षणा सलगर यांचे नेतृत्व राज्यभर पोहोचले.
दरम्यान, जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यावेळी सक्षणा सलगर यांनी शरद पवार यांच्या सोबत निष्ठा कायम ठेवली. राष्ट्रवादीतील फुटीपूर्वी शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पवारांच्या निवृत्तीला विरोध करणाऱ्यांमध्ये सलगर याचं नाव आघाडीवर होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सलगर या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र संधी मिळाली नाही. त्यानंतरही त्या पक्षसंघटनेत कार्यरत राहिल्या. याचंच फळ म्हणून त्यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षपदी संधी मिळाली आहे.