सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 10:44 AM2019-06-06T10:44:03+5:302019-06-06T10:56:59+5:30
भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती.
सीतापूर : उत्तरप्रदेशच्या उन्नाव मतदारसंघातून जिंकलेले भाजपाचे खासदार आणि वाचाळ नेते साक्षी महाराज हे बुधवारी सीतापूरला आले होते. यावेळी त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी बांगरमऊचा आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली.
यावेळी कुलदीप सिंह यांना साक्षी महाराजांनी यशस्वी आणि लोकप्रिय असल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे आभार मानने योग्य वाटले म्हणून तुरुंगात भेटायला आलो, असे त्यांनी सांगितले. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
बुधवारी ईदनिमित्त सुट्टी होती. तरिही तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्यास दिले. यासाठी साक्षी महाराजांनी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले. आमदार खूप काळापासून तुरुंगात आहेत. त्यांची समस्या आणि सुविधांची काळजी मी करू शकत नाही. यामुळे केवळ भेटण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
2018 पासून तुरुंगात आहेत कुलदीप सिंह
भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. जून, 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीने आमदार कुलदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याने पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर वातावरण संतप्त बनल्याने 13 एप्रिल 2018 मध्ये आमदाराला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.