साक्षी महाराजांचे भाजपला 'अल्टीमेटम'; उमेदवारी न दिल्यास पराभव अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:13 PM2019-03-12T21:13:15+5:302019-03-12T21:13:55+5:30
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन दिवसही झाले नसताना उमेदवारांनी तिकीट कापले जाण्याच्या भितीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज आघाडीवर आहेत. साक्षी महाराज यांनी पत्रातून राज्यातील पक्ष नेतृत्वाला अल्टीमेटम दिला आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांचे नाव कापण्यात येणार आहे. यामध्ये साक्षी महाराज यांचेदेखील नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहिले की, मी उन्नावमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात मागील दहा वर्षांत भाजपचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. परंतु, आज भाजपचे सहा आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पक्षाने आपल्याविरुद्ध काही निर्णय घेतल्यास, याचा देश आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगला नसेल, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. उन्नावमधून मला पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी. यावेळी मी महायुतीच्या उमेदवाराला पाच लाखांहून अधिक मतांनी मात देईल, असंही साक्षी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे. यावेळी साक्षी महाराज यांनी जिल्ह्यातील मतदारांची जातीनिहाय आकडेवारी पक्ष नेतृत्वाला दिली आहे.
दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात. तसेच भाजपाकडून एखाद्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि त्याचे समर्थन करणारे म्हणूनही साक्षी महाराज यांनी ओळख आहे.