केवळ सरकारांनाच पेगॅससची विक्री, इस्रायलचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 07:44 AM2021-10-30T07:44:46+5:302021-10-30T07:45:02+5:30
Pegasus : काेणत्याही खासगी कंपनी किंवा अशासकीय संस्थेला त्याची विक्री हाेत नसल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलाेन यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : जगभरातील बडे राजकीय नेते, पत्रकार इत्यादींवर पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले पेगॅसस स्पायवेअर हे केवळ सरकारांनाच विकण्यात येते. काेणत्याही खासगी कंपनी किंवा अशासकीय संस्थेला त्याची विक्री हाेत नसल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलाेन यांनी स्पष्ट केले. पेगॅससवरुन देशात सुरू असलेला वाद हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.
सर्वाेच्च न्यायालयाने नुकतेच पेगॅसस हेरगिरीप्रकरणी चाैकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकार हात झटकू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले हाेते. त्यानंतर गिलाेन यांनी एका पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. भारत सरकारने पेगॅसस स्पायवेअरची खरेदी करण्यासाठी संपर्क केला हाेता, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर गिलाेन यांनी सांगितले, की भारतात सुरू असलेला वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एनएसओ किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांना निर्यात करण्यासाठी इस्रायल सरकारकडून परवाना आवश्यक असताे.