सलमान सुटला !

By Admin | Published: July 26, 2016 05:37 AM2016-07-26T05:37:32+5:302016-07-26T05:39:04+5:30

१८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून

Salman cleared! | सलमान सुटला !

सलमान सुटला !

googlenewsNext

जोधपूर : १८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची सोमवारी निर्दोष मुक्तता केली.
चिंकारा हा राजस्थानचा राज्यप्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार तो संरक्षित वन्यजीव आहे. जोधपूरजवळील भावाड येथे व त्यानंतरच्या रात्री मथानिया येथील घोदा फार्म येथे मिळून २६ व २७ सप्टेंबर १९९८ दरम्यानच्या रात्री चिंकारा जातीच्या दोन हरणांची अवैध शिकार केल्याचे खटले राजस्थान सरकारच्या वन विभागाने सलमान खानवर दाखल केले होते. सन २००६ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने या दोन खटल्यांमध्ये सलमान खानला अनुक्रमे एक वर्ष व पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या.
सत्र न्यायालयानेही हानिकाल कायम ठेवल्यानंतर सलमान खानने याविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाकडे दोन अपिले केली होती. न्या. निर्मलजीत कौर यांनी अपुऱ्या पुराव्यामुळे संशयाचा फायदा देत दोन्ही अपिले मंजूर करून सलमान खानची दोन्ही खटल्यांत निर्दोष मुक्तता केली.
आजच्या या निकालाच्या वेळी स्वत: सलमान खान न्यायालयात हजर नव्हता. मात्र त्याची बहीण अलविरा उपस्थित होती.

शुक्लकाष्ट कायम...
- या निकालामुळे सलमान खानला दिलासा मिळाला असला तरी त्या चित्रिकरणाच्या वेळी केलेल्या कथित अवैध शिकारींच्या आरोपांवरून त्याच्यामागे लागलेले खटल्यांचे शुल्ककाष्ठ पूर्णपणे सुटलेले नाही. 
आणखी दोन खटल्यांचे निकाल व्हायचे आहेत. त्यापैकी एक खटला ज्याच्या परावान्याची मुदत संपून गेली आहे अशा शस्त्राचा अवैध वापर केल्याबद्दल आर्म्स अ‍ॅक्टखालचा आहे. 
तर, दुसरा १ व २ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कांकणी येथे दोन काळविटांची अवैध शिकार केल्यासंबंधीचा आहे.

सलमानविरुद्धच्या मुंबईतील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यातील राज्य सरकारने केलेले अपिलही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यात सत्र न्यायालयाने ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली होती.

आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे. या निकालाने सलमानसह आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे.
- अर्पिता, सलमान
खानची बहीण

त्या दिवशी वाहन चालविणाऱ्या हरीष दुलानीच्या जबानीवरून सलमानला या खटल्यांत निष्कारण गोवले गेल्याचे आमचे सुरुवातीपासून म्हणणे होते. उच्च न्यायालयाच्या निकालाने तेच सिद्ध झाले. -अ‍ॅड. महेश बोरा, सलमानचे वकील

निकालपत्राचा सविस्तर अभ्यास केल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे की नाही याचा राज्य सरकार निर्णय घेईल.-के.एल. ठाकूर,
अतिरिक्त महाधिवक्ता, राजस्थान

Web Title: Salman cleared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.