सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 06:25 AM2018-04-08T06:25:11+5:302018-04-08T06:25:11+5:30

दोन काळविटांची २० वर्षांपूर्वी अवैध शिकार केल्याबद्दल, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान दोन रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मुक्काम केल्यानंतर शनिवारी जामिनावर सुटला.

Salman cleared! Suspension of punishment; Immediately return home late at night | सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला

सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला

googlenewsNext

जोधपूर : दोन काळविटांची २० वर्षांपूर्वी अवैध शिकार केल्याबद्दल, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान दोन रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मुक्काम केल्यानंतर शनिवारी जामिनावर सुटला. या सुटकेमुळे त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतविलेल्या अनेक निर्मात्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन जामिनांवर सलमानच्या सुटकेचा आदेश दिला. दुपारीच जामिनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सलमान सायंकाळी तुरुंगातून बाहेर पडला. पोलीस बंदोबस्तात तो मुंबईला येण्यासाठी विमानतळावर रवाना झाला. न्यायालयाने सलमानला जामीन देण्याखेरीज अपिलावर सुनावणी होईपर्यंत, त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिली. अपिलाच्या सुनावणीच्या वेळी येत्या ७ मे रोजी हजर राहण्यास त्याला सांगण्यात आले. न्यायालयाच्या संमतीखेरीज त्याला देशाबाहेर जाता येणार नाही. जामीन अर्जावर सुमारे दोन तास सुनावणी झाली. सलमानच्या वतीने अ‍ॅड. महेश बोरा व हस्तीमल सारस्वत यांनी निकाल का चुकीचा आहे, याचे ५७ मुद्दे मांडले. २० वर्षे सलमान जामिनावर होता व त्याने जामिनाचा गैरवापर केला नाही, यावर भर दिला. पब्लिक प्रॉसिक्युटर पोकर राम यांनी जामिनास विरोध करीत काळविटांच्या शिकारीची अन्य तीन प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, याकडे लक्ष वेधले.

चाहत्यांचे मानले आभार
जामीन मिळाल्यानंतर सलमान खास चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाला. घरी परतणाऱ्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी बँडस्टँड परिसरातील रस्ते फॅन्सच्या गर्दीने भरून गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास सलमान ताफ्यासह गॅलॅक्सी इमारतीमध्ये दाखल झाला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एकच चाहत्यांनी जल्लोष केला. घरी पोहोचल्यावर सलमानने गॅलॅक्सीच्या गॅलरीतून जमलेल्या फॅन्सचे हात जोडून आभार मानले.

बदली आदेशाने संभ्रम : सुनावणी करणारे न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांची शुुक्रवारी रात्री सिरोही येथे बदली झाल्याचे आदेश आल्याने, सलमानला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागते की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. राजस्थान उच्च न्यायालयाने एकूण ८७ न्यायाधीशांच्या नियमित बदल्यांचे आदेश काढले, त्यात जोशींचेही नाव होते, परंतु नव्या ठिकाणी रुजू व्हायला सात दिवसांचा अवधी असल्याने, त्यांनी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली.

Web Title: Salman cleared! Suspension of punishment; Immediately return home late at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.