सलमानकडून माफी नाहीच!
By admin | Published: June 30, 2016 05:36 AM2016-06-30T05:36:22+5:302016-06-30T05:36:22+5:30
बलात्कारासंबंधी वादग्रस्त विधानाबद्दल अभिनेता सलमान खान याने राष्ट्रीय महिला आयोगाला पाठविलेल्या उत्तरात माफी मागितलेली नसून
नवी दिल्ली : बलात्कारासंबंधी वादग्रस्त विधानाबद्दल अभिनेता सलमान खान याने राष्ट्रीय महिला आयोगाला पाठविलेल्या उत्तरात माफी मागितलेली नसून आयोग या मुद्यासंबंधी कायदेशीर बाबींकडे लक्ष देत असल्याचे अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सलमानने बुधवारी हजेरी टाळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने त्याला ७ जुलै रोजी हजर होण्याबाबत नव्याने समन्स जारी केला आहे.
सुल्तान या चित्रपटाचे चित्रीकरण थकवून टाकणारे होते. कुस्तीच्या शूटिंगसाठी सराव केल्यानंतर एखाद्या बलात्कारपीडितेसारखे वाटत होते, असे विधान सलमानने केल्यानंतर वाद उफाळला होता. सोशल मीडियावरही सडकून टीका झाल्यानंतर आयोगाने स्वत:हून दखल घेत त्याला नोटीस पाठविली. (वृत्तसंस्था)
>माफी मागण्यास सांगितले
आयोगाने गेल्या आठवड्यात सलमानला नोटीस पाठविताना पाच दिवसांत उत्तर मागितले होते. आम्ही सलमानला सात दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. त्याने जाहीर माफी मागावी असे सुचविले आहे, असे कुमारमंगलम यांनी सांगितले. प्रसंगी त्याला पाचारण केले जाईल.
सलमानचे उत्तर असमाधानकारक आहे. राज्य महिला आयोगाला त्याला पाचारण करण्याचे अधिकार आहेत. एकाचवेळी दोन ठिकाणी सुनावणी केली जाऊ शकते. - विजया रहाटकर,
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष.
राज्य आयोगाला उत्तर...
सलमानने मंगळवारी राज्य आयोगाला पाठवलेल्या पत्रात एकाचवेळी दोन ठिकाणी सुनावणी होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. राज्य आयोगाने यावर असमाधान व्यक्त केले.