सलमान खान दोषी नाही, सबळ पुराव्याचा अभाव - मुंबई हायकोर्ट
By admin | Published: December 10, 2015 01:19 PM2015-12-10T13:19:21+5:302015-12-10T17:50:59+5:30
हिट अँड रन प्रकरणात सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले आणि बॉलीवूडमधल्या या सुपरस्टारच्या डोळ्यातआनंदाश्रू तरळले. सत्र न्यायालयाने सलमानला दारू पिऊन विनापरवाना गाडी चालवल्याबद्दल दोषी धरले होते आणि फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. हायकोर्टातून तात्काळ जामीन मिळवत सलमानने त्यावेळी तुरुंगवारी वाचवली होती, परंतु हायकोर्टाच्या निकालाची टांगती तलवार त्याच्या मानेवर होती, जी आज उतरली.
सलमान सलीम खानने दाखल केलेली याचिका स्वीकारण्यात येत आहे आणि त्याच्याविरोधातील सर्व आरोपांमधून त्याला मुक्त करण्यात येत आहे, असा निकाल न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी दिला आणि सलमानला प्रचंड दिलासा मिळाला. त्याला सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्यात येत असल्याचे जोशी यांनी जाहीर केले.
सलमानच्या वकिलांनी त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या तर सलमान कुटुंबियांच्या घोळक्यात दाखल झाला. सलमानचा बॉडीगार्ड शेरा, त्याची बहीण अलविरा अग्निहोत्री, मेहुणा आयुष शर्मा सलमानसोबत होते. आज निकाल जाहीर होणार हे सकाळी निश्चित झाले आणि निकाल आरोपीच्या उपस्थितीतच सुनावला जात असल्याने कर्जतला शुटिंगमध्ये असलेला सलमान दुपारी दीडच्या सुमारास कोर्टात आला आणि खान कुटुंबियांसाठी शेवट गोड झाला.
सलमानची बाजू कोर्टात मांडणा-या अमित देसाई या वकिलाचे सलमानने आभार मानले.
काय म्हणाले न्यायाधीश ए. आर. जोशी
- सलमान खानवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला असून केवळ संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवले जाऊ शकत नाही.
- सलमान खान गाडी चालवत होता का, तो गाडी चालवत असेल तर दारू प्यायला होता का, गाडीचा अपघात टायर फुटल्यानंतर झाला की अपघातानंतर टायर फुटला या गोष्टी निर्विवादपणे सिद्ध करण्यास सरकारी वकिल पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
- शिक्षा होण्यासाठी आरोप निर्विवाद सिद्ध व्हावा लागतो, केवळ परिस्थितीजन्य पुरावा, जनमत आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चा याआधारे शिक्षा देता येत नाही.
- मृत शरीररक्षक रवींद्र पाटील याने सलमान गाडी चालवत होता ही साक्ष दिली होती. परंतु हा साक्षीदार संपूर्णपणे विश्वासार्ह नाही.
काय आहे हे प्रकरण
२००२ साली अभिनेता सलमान खानने दारूच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून वांद्रे येथील फूटपाथवरील लोकांना चिरडले, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.