सलमान खानला न्यायालयाची जामीन नाकारण्याची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:55 AM2019-07-05T04:55:59+5:302019-07-05T05:00:02+5:30
सलमान खान यांच्या वकिलाने नंतर तुरूंगवासाच्या शिक्षेला आव्हान देऊन जामिनासाठी अर्ज केला.
जोधपूर : दोन काळवीट हत्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने अभिनेते सलमान खान यांना ते गुरुवारी सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल तंबी दिली आहे. यापुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास त्यांचा जामीन नाकारला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
खान यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांचे वकील आनंद देसाई निवेदनाद्वारे म्हणाले होते की, सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. निवाड्याचा अभ्यास करताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की, संपूर्ण तपासच आणि या प्रकरणाची वस्तुस्थिती ही सलमान खान यांना राजस्थानच्या सन्माननीय उच्च न्यायालयाने ज्या दोन प्रकरणात निर्दोष ठरवले त्या सारखीच आहे.
खान यांच्या वकिलाने नंतर तुरूंगवासाच्या शिक्षेला आव्हान देऊन जामिनासाठी अर्ज केला. दोन रात्र तुरुंगात काढल्यानंतर खान यांना ५० हजार रुपयांचा बाँड आणि दोन तेवढ्याच रकमेच्या हमीपत्रांवर जामीन मंजूर केला गेला आहे.