'मेक इन इंडिया'विषयी कलाम यांनी दिला होता सावधानतेचा इशारा
By Admin | Published: October 18, 2015 03:01 PM2015-10-18T15:01:52+5:302015-10-18T15:01:52+5:30
मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता. मेक इन इंडिया ही मोहीम अति महत्त्वाकांक्षी मोहीम असली तरी यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे असे मत कलाम यांनी मांडले होते. सध्याचे राजकारण म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ बनल्याचे कलाम यांना वाटत होते.
अब्दुल कलाम आणि त्यांचे निकटवर्तीय सृजनपाल सिंह यांनी लिहीलेल्या 'अॅडव्हांटेज इंडिया, फ्रॉम चॅलेंज टू ऑपोर्च्यूनिटी' या पुस्तकात कलाम यांनी त्यांची मतं मांडली आहेत. या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असून प्रकाशनापूर्वी पुस्तकातील काही भाग आता समोर आले आहेत. 'भारतातील विकासात विभिन्नता आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने प्रगती केली आहे, पण अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाही. आपल्याला पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही' असे मत कमाल यांनी मांडले आहे. मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी मोहीमेची देशाला गरज आहे, मात्र यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये, यामुळे विकासाच्या मोबदल्यात जनतेला मोठी किंमत चुकवावी लागेल असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या राजकारणावरही कलाम यांनी पुस्तकात रोकठोख मतं मांडली आहेत. सध्याचे राजकारण संगीत खुर्चाच्या खेळाप्रमाणे बनले आहे. ठराविक नेते आणि त्यांच्या मर्जीतील मंडळी सत्तेवर येतात आणि दुस-यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. अशा समुहातील नेत्यांकडे प्रामाणिकपणा नसतो, हे भ्रष्ट नेते त्यांच्याकडील मशाल त्यांच्याच गटातील दुस-या गटातील नेत्याकडे सोपवतात असे परखड मत कलाम यांनी मांडले आहे. राजकारणात सुनियोजित व्यवस्था निर्माण केल्यास नवीन आणि कुशल नेत्यांना संधी मिळेल आणि भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल असे कलाम यांनी नमूद केले.