चिंकारा शिकार प्रकरणात सुटला सलमान
By Admin | Published: July 25, 2016 10:34 AM2016-07-25T10:34:01+5:302016-07-25T13:46:03+5:30
बॉलिवूडचा दबंग सलमान खानची सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने १९९८ सालच्या चिंकारा शिकार प्रकरणात सबळ पुराव्या अभावी सुटका केली.
>
ऑनलाइन लोकमत -
राजस्थान, दि. 25 - बॉलिवूडचा दबंग सलमान खानची सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने १९९८ सालच्या चिंकारा शिकार प्रकरणात सबळ पुराव्या अभावी सुटका केली. सलमान खान आणि अन्य सातजणांवर दोन स्वतंत्र घटनांमध्ये चिंकारा आणि काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. या दोन प्रकरणात सत्र न्यायालयाने सलमानला एक आणि पाचवर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या निर्णया विरोधात सलमानने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. चिंकारा शिकार प्रकरणात सलमान सुटला असला तरी, काळवीट शिकार प्रकरणी निकाल अजून बाकी आहे. आजचा निकाल ऐकण्यासाठी सलमानची बहिण अलविरा वकिलासह न्यायालयात हजर होती. वांद्रे हिट अॅण्ड रन प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर आता चिंकारा शिकार प्रकरणातूनही निर्दोष सुटका झाल्याने सलमान खानला दिलासा मिळाला आहे. तब्बल 18 वर्षानंतर याप्रकरणी निकाल आला आहे.
चिंकारा आणि काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान खानने निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने आपला निर्णय सुनावत चारपैकी दोन प्रकरणात सलमानची सुटका केली आहे.
‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, 12 ऑक्टोबर 1998च्या रात्री सलमानने जोधपूरच्या कनकनी गावात काळवीटची शिकार केली होती, असा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात राजस्थान सरकारने 2006मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र राजस्थान हायकोर्टाने 15 मे 2013 रोजी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरु झाली होती. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाचा निकाल देण्यात येणार होता, मात्र काही साक्षीदारांच्या तपासणीसाठी परवानगी देण्यात आल्याने प्रकरण प्रलंबित राहिले होते.
त्याच्यावर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सलमानने आर्म्स अॅक्ट हटवण्याची याचिकाही केली होती. सलमानसह अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलमवर काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता.