सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:34 AM2018-04-07T01:34:34+5:302018-04-07T01:34:34+5:30
सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत.
जोधपूर - सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. तो निकाल आज लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. सलमानला निश्चितच जामीन मिळेल, असे त्याच्या वकिलांना वाटत आहे.
अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आज सकाळी तुरुंगात सलमानची भेट घेतली. सलमानला उद्या जामीन मिळेल व तो नंतर मुंबईला येईल, या अंदाजामुळे बॉलिवूडमधील कोणीही त्याला भेटण्यासाठी जोधपूरला आले नसल्याचे समजते. प्रीती आधीपासून राजस्थानात असल्याने ती भेटायला गेली, असे समजते. सलमानला जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला की मात्र बॉलिवूडमधील मंडळी त्याला भेटायला त्याच्या घरी जातील, असे सूत्रांनी सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणालाही त्याला आताही भेटण्यात अडचण वाटत नाही. पण उद्या त्याची सुटका होण्याची शक्यता असल्याने कोणी आज जोधपूरला गेले नाही, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
सलमानच्या वकिलाला धमक्या
जोधपूर सत्र न्यायालयासमोर सलमान खानची बाजू मांडणारे अॅड. महेश बोरा यांनी आपणास आज धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सलमानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये, यासाठी मला धमक्या देण्यात आल्या. मला एसएमएस व इंटरनेट कॉलद्वारे धमकावण्यात आल्याचे अॅड बोरा यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.
वन्यजीवांच्या रक्षणासाठी बिष्णाई टायगर्स फोर्स
संपूर्णत शाकाहारी असणाऱ्या समाजाने वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाची म्हणजेच जनावरांच्या शिकारीची आतापर्यंत ४00 हून अधिक प्रकरणे उघडकीस आणली असून, कित्येकांना तुरुंगातही पाठविले आहे. शिकार रोखणे व ती झाल्यास तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करणे, यांत त्यांची बिष्णोई टायगर्स फोर्स ही संघटना सक्रिय असते. त्यामुळेच सलमान खानला काल शिक्षा होताच, बिष्णोई समाजाने न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला होता.
न्यायालयात प्रकरण गेल्यावर साक्षीदार तिथे वेळेत पोहोचतील, व्यवस्थित साक्ष देतील, ते फुटणार नाहीत आणि पुराव्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी ही संघटना घेते, असे फोर्सचे अध्यक्ष रामपाल भंवड यांनी सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण करताना, बिष्णोई समाजाचे २0 हून अधिक लोक मरण पावले असल्याचा दावाही त्यांनी केला.