सलमानला दिलासा, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी मुक्तता
By admin | Published: January 18, 2017 11:50 AM2017-01-18T11:50:40+5:302017-01-18T12:28:52+5:30
अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
Next
ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. १८ - अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. सबळ पुराव्या अभावी सलमान खानला संशयाचा फायदा देत जोधपूरमधील सत्र न्यायालयाने त्याची अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपातून मुक्तता केली आहे. निकाल सुनावण्यात आला तेव्हा स्वत: सलमान त्याची बहीण अलविरासह न्यायालयात उपस्थित होता. तसेच न्यायालयाच्या आवारात सलमानच्या चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती.
या प्रकरणात सलमानविरोधात चार गुन्हे दाखल असून त्यातील अवैध शस्त्रास्त्र बळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आज जोधपूरच्या न्यायालयात लागणात होता. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 1998 साली 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, परवाना संपलेले शस्त्र बेकायदेशीररित्या वापरल्याबद्दल जोधपूर पोलिसांनी सलमान खान विरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. गेल्या वर्षी 9 डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. अखेर आज याप्रकरणी निर्णय सुनावण्यात आला.
#FLASH Jodhpur CJM Court acquits Salman Khan in the Arms Act Case.
— ANI (@ANI_news) 18 January 2017
या खटल्यात सरकारी पक्षाला न्यायालयात सलमानविरोधात सबळ पुरावे उभे करता आले नाहीत, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच सबऴ पुराव्यांअभावी संशयाचा फायदा देत सलमानची मुक्तता केली. अवघ्या दीड ओळींमध्ये निकाल वाचून दाखवत न्यायाधीशांनी सलमानची या खटल्यातून मुक्तता केली. अवैध शस्त्र बाळगल्याच्या खटल्यातून मुक्तता झाल्याने आता काळवीट शिकार प्रकरणातूनही सलमानची मुक्तता होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, सरकारी पक्षाला सबळ पुरावे देता न आल्याने न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केल्याचे सलमानच्या वकिलांनी सांगितले. तर निकालाची प्रत हाती आल्यावर आम्ही या प्रकरणी पुढील निर्णय घेऊ, असे बिष्णोई समाजाच्या वकिलांनी सांगितले.
Rajasthan: Salman Khan leaves Jodhpur CJM Court after the Court acquits the actor in the Arms Act case. pic.twitter.com/K5mX0GG2e4
— ANI (@ANI_news) 18 January 2017
नक्की काय आहे प्रकरण?
परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. दरम्यान सलमानची ही शस्त्र चोरी गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये शस्त्र आढळली, असेही याचिकाकर्त्याने नमूद केले होते. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.