आधी समर्थन मग माफी, याकूब मेमनप्रकरणात सलमानचा टिवटिवाट
By admin | Published: July 26, 2015 09:32 AM2015-07-26T09:32:39+5:302015-07-26T19:19:24+5:30
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनच्या समर्थनार्थ आता अभिनेता सलमान खानही मैदानात उतरला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२६ - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनच्या समर्थनार्थ आता अभिनेता सलमान खानही मैदानात उतरला आहे. एका निष्पापाला फाशीची शिक्षा देणे म्हणजे माणूसकीची हत्या असून याकूबऐवजी टायगर मेमनला फाशी द्यावी अशी मागमी सलमान खानने केली आहे.
याकूब मेमनच्या फाशीसंदर्भात सलमान खानने रविवारी ट्विटरव्दारे मुक्ताफळे उधळली. गेल्या तीन दिवसांपासून मला याकूबच्या फाशीवर बोलायचे होते. पण घाबरत होतो, यात याकूबचे कुटुंब भरडले जात आहे. याकूबऐवजी भारतातून पळून गेलेल्या टायगरला भारतात परत आणून फाशी द्यावी अशी मागणी त्याने केली. टायगर पाकमध्ये असेल तर नवाझ शरीफ यांनी त्याला भारताकडे सुपूर्त करावे असेही त्याने म्हटले आहे. सलमान खानच्या या ट्विटवर विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सलमानने न्यायालयाचा अपमान केला अशी टीका त्यांनी केली आहे.
सलमानच्या ट्विटरवर त्याचे वडिल सलीम खान यांनीही सलमान कान पिरगळले. सलमान खानचे ट्विट निरर्थक व हास्यास्पद असून त्याकडे दुर्लक्ष करावे असे त्यांनी म्हटले होते. वडिलांकडून कानउघडणी झाल्यावर सलमान खानने रविवारी संध्याकाळी ट्विटवर दिलगिरी व्यक्त केली. माझ्या ट्विटमुळे गैरसमज निर्माण झाल्याचे वडिलांनी सांगितल्याने मी माझे ट्विट मागे घेतो, मी याकूब निर्दोष असल्याचे म्हटले नसून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न नव्हता असेही त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, एकीकडे सलमान खानने याकूब मेमनचे समर्थन मागे घेतले असले तरी देशभरातील ४० नेते व सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलावंतांनी याकूबच्या फाशीला विरोध दर्शवला आहे. यामंडळींनी राष्ट्रपतींना पत्र पाठवत याकूबला फाशी न देण्याची मागणी केली. पत्र पाठवणा-यांमध्ये भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी यांच्यासह महेश भट, नसरुद्दीन शहा, सिताराम येचूरी, माजी न्यायाधीश पी.बी सावंत, कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण आदी नेत्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.