Salt Crisis: महागाई, वीजटंचाईनंतर आता देशवासियांचं भोजन होणार अळणी, रेल्वेच्या त्या निर्णयामुळे मीठटंचाईचं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:50 AM2022-05-03T11:50:01+5:302022-05-03T11:50:33+5:30
Salt Crisis In India: कोळशाच्या टंचाईमुळे ऐन उन्हाळ्यात देशासमोर वीज टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यातच आता या संकटांच्या मालिकेत अजून एका संकटाची भर पडणार असून, रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशात मीठ टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील जनता महागाईने होरपळलेली असतानाच कोळशाच्या टंचाईमुळे ऐन उन्हाळ्यात देशासमोर वीज टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यातच आता या संकटांच्या मालिकेत अजून एका संकटाची भर पडणार असून, रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशात मीठ टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देशवासियांचं जेवणही अळणी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशातील वीज टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोळशाचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने गुजरातमधील कच्छ येथून देशातील विविध राज्यांत होणाऱ्या मिठाच्या पुवठ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विजेच्या संयंत्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण जाल्याने रेल्वेने कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना प्राधान्य दिले आहे. दरम्यान, मिठाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, आता त्यांना औद्योगिक आणि खाण्यासाठीच्या मिठाच्या वाहतुकीसाठी दररोज केवळ ५ गाड्या उपलब्ध होत आहेत. कोळशाची आयात वाढल्यावर ही संख्या अजून कमी होऊ शकते. याआधी मिठाच्या वाहतुकीसाठी आठ गाड्या उपलब्ध होत असत.
एका रिपोर्टनुसार रेल्वे मंत्रालयाने कच्छच्या अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रमाने उत्तर भारतातील सहा वीज उत्पादन केंद्रांमध्ये कोळसा पोहोचवण्यास सांगितले आहे. कच्छमधून देशातील औद्योगिक आणि भोजनात वापरण्यात येणाऱ्या मिठाच्या गरजेच्या ७५ टक्के मिठाचा पुरवठा केला जातो. एका मालगाडीच्या एका रेकमध्ये सुमारे २ हजार ७०० टन खाद्योपयोगी मीठ नेले जाते.
तर औद्योगिक वापराच्या मिठासाठी एका रेकच्या वाहतुकीची क्षमता सुमारे ३ हजार ८०० ते ४ हजार टन एवढी असते. कच्छमध्ये दरवर्षी सुमारे २.८६ कोटी टन मिठाचे उत्पादन होते. तसेच यामधील २ कोटी टन मिठाचा खप हा देशांतर्गत बाजारामध्ये औद्योगिक आणि खाद्य वापरासाठी होतो. औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी १.२ कोटी टन मिठाचा वापर होतो.
मीठ उद्योगातील संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्थितीमुळे दीर्घकाळापर्यंत देशामध्ये मिठाची टंचाई निर्माण होऊ शकते. एकदा टंचाई निर्माण झाल्यानंतर त्याची भरपाई करण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाने त्यांना गुजरात, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये ६ विजेच्या संयंत्रांना प्राधान्यक्रमाच्या आधारावर कोळशाचा पुरवठा करण्याची सूचना दिली होती.