ही आहे देशाची 'कोरोना वॉरिअर'; आज घरात वाजणार होती 'सनई', पण तिने देश सेवेला दिले प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:15 PM2020-04-14T19:15:25+5:302020-04-14T19:34:45+5:30
पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे.
मंडी : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण दिसत आहे. असे असतानाच वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस प्रशासन जीव तळहातावर घेऊन देशासाठी आपले योगदान देत आहेत. मंडी येथील नर्स पूजा हिने काहीसा असाच आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील नर्स पूजा हिचे आज (14 एप्रिल) लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे ते टाळावे लागले. मात्र, असे असतानाही ती संभवित कोरोना बाधितांची सेवा करतच होती. ज्या दिवशी तिचा विवाह होणार होता, अगदी त्या दिवशीही रुग्णालयात जाऊन तिने रुग्णांना सेवा दिली. ती येथील चंबा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे.
ज्या दिवशी होणार होते लग्न त्याच दिवशी रुग्णांची सेवा करत होती पूजा -
पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे. देश संकटात आहे आणी पूजा यावेळी लोकांची मदत करत आहे. ती आजही रुग्णालयात गेली. यापेक्षा अधिक पुण्याचे काम असूच शकत नाही. थोडे वाईट नक्कीच वाटले. लग्नाची सर्व तयारी झाली होती.
यासंदर्भात बोलताना पूजाची आई किरन शर्मा सांगतात, त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो. त्यांची मुलगी, अशा गंभीर परिस्थितीतही लोकांची सेवा करत आहे. लग्न नंतरही होऊ शकते. पूजाला त्यांच्या होणाऱ्या सासरचाही पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांच्या आईंनी सांगितले.